असे होते नादिया गुलामचे अफगाणिस्तानमधील जीवन


अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये जिथे सर्व सामन्य पुरुषांचे जीवनच मोठे हालाखीचे आहे, तिथे एका महिलेचे आयुष्य कसे असेल याची कल्पना न केलेलीच बरी. ज्या देशामध्ये तालिबान सारख्या संघटनाचे आधिपत्य आहे, त्या देशामध्ये महिलांसाठी आयुष्य मोठे कठीण आहे. तालिबानच्या अधिपत्याखाली जिथे महिलांनी घराबाहेर पडणेच मोठे धोक्याचे आहे, तिथे महिलांनी नोकरी करण्याची संकल्पनाच अशक्यप्राय आहे. पण नादिया गुलाम नामक तरुणीला हे धाडसही करावे लागले. हे धाडस करण्यासाठी नादिया गेली दहा वर्षे वेषांतर करून, एका पुरुषाच्या वेषामध्ये वावरत आहे. तब्बल सहा वर्षे नादियाने आपली खरी ओळख लपविली होती. या काळामध्ये आपल्या मृत भावाप्रमाणे दिसण्यासाठी वेषांतर करून नादिया वावरत होती. तालिबानपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी हे धाडस आपल्याला करावे लागले असल्याचे नादिया सांगते.

नादियाचा जन्म अफगाणिस्तान मधेच झाला. स्त्रियांसाठी तालिबानने आखून दिलेल्या कठोर कायद्याच्या चौकटीत नादिया लहानाची मोठी होत होती. नादिया आठ वर्षांची असताना झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये नादियाच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये नादिया गंभीर जखमी झाली. या स्फोटामध्ये तिच्या भावाचा मृत्यू झाला. युद्धपरिस्थिती काय असते, आणि त्याचा लोकांच्या आयुष्यांवर काय परिणाम होऊ शकतो याची खऱ्या अर्थाने जाणीव त्यावेळी नादियाला झाली. जखमी नादियाला रुग्णालयात भरती केल्यानंतर तिच्या असे लक्षात आले, की त्या रुग्णालयामध्ये तिच्याप्रमाणे अनेक लहान मुले होती. यातील अनेक मुलांना झालेल्या शारीरिक इजा नादियाला झालेल्या इजेपेक्षा भयंकर होत्या. या परिस्थितीतून नादिया सुखरूप बचावली आणि आपल्या घरी परतली.

वयाच्या अकराव्या वर्षी नादियाने आपल्या मृत भावाप्रमाणे दिसण्यासाठी वेषांतर करून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तालिबानच्या अधिपत्याखाली महिलांनी घराबाहेर पडून नोकरी करणे मना असले, तरी आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी नादियाला घराबाहेर पडण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्याकाळी तालिबानने आणखी एक कायदा अस्तित्वात आणला. या कायद्याअंतर्गत मुलींनी, तरुणींनी शिकण्यासाठी शाळा-कॉलेजांमध्ये जाण्यावरही तालिबानने बंदी आणली. मात्र नादियाचा नाईलाज होता. तिच्या वडिलांची प्रकृती अतिशय खराब होती, आणि भावाचा आधीच मृत्यू झाला असल्याने परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्याची जबाबदारी नादियावर आली होती.

वयाच्या अकराव्या वर्षी अखेर नादिया मुलाप्रमाणे वेषांतर करून घराबाहेर पडली, काम करू लागली. तिच्या कमाईच्या जोरावर परिवाराचा उदरनिर्वाह होऊ लागला. नादियाचे खरे रूप समोर येण्याचा धोका अनेकदा उत्पन्न झाला, पण नादियाचे नशीब बलवत्तर असल्याने प्रत्येक कठीण प्रसंगातून ती सुखरूप बचावली. अफगाणिस्तान मध्ये आयुष्य केवळ स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांसाठीही खडतर आहे. कधी बॉम्बस्फोट, तर कधी आत्मघातकी हल्ले, येथे कोणाच्याच जीवाची शाश्वती नसल्याचे नादिया म्हणते. आता नादिया बार्सिलोनामध्ये वास्तव्य करून आहे. येथे राहून नादिया एका एनजीओसाठी कार्यरत असून, अफगाणिस्तान मधील लहान मुलांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते.

Leave a Comment