प्रथम भेटीमध्ये असे असावे संभाषण


जेव्हा एखाद्या खासगी कार्यक्रमाच्या किंवा कामाच्या निमिताने आपण प्रथमच एख्याद्या व्यक्तीला भेटणार असू, तेव्हा त्यावेळी उभयतांमध्ये होणारे संभाषण महत्वाचे ठरत असते. किंबहुना आपल्या व्यक्तिमत्वाची, विचारांची सकारात्मक छाप समोरच्या व्यक्तीवर पडण्याच्या दृष्टीने हे संभाषण महत्वाचे असते. आपल्या संभाषणाच्या मार्फत समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, विचार, ती व्यक्ती करीत असलेल्या कामाचे स्वरूप, इत्यादी प्राथमिक माहिती आपल्याला मिळावी हा आपला आणि समोरच्या व्यक्तीचाही उद्देश असतो. पण ही माहिती मिळविण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात यावरुन तुमचे संभाषणचातुर्य समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत असते. म्हणूनच संभाषण करीत असताना आपण विचारतो त्या प्रश्नांचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या नेमका लक्षात यावा या बेताने आपल्या शब्दांची निवड करणे आवश्यक आहे. अनेकदा आपण विचारलेल्या प्रश्नाने समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होऊन समोरची व्यक्ती अवघडल्यासारखी होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला प्रथम भेटताना आपल्याला विचारायचे असलेले प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. याची काही उदाहरणे पाहू या.

अनेकदा एखाद्या व्यक्तीला प्रथमच भेटल्यानंतर ‘तुम्ही कुठे नोकरी करता?’ (what do you do for work?)हा सर्वात आधी विचारलेल्या प्रश्नांपैकी एक असतो. ‘संवाद विशेषज्ञांच्या’ (communication experts) म्हणण्यानुसार हा प्रश्न काहीसा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. एखाद्याला थेट ‘कुठे नोकरी करता’ हे विचारण्याच्या ऐवजी ‘मला आपल्याबद्दल काही सांगा’, (tell me something about yourself) असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला असा, समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला हवी असलेली सर्व माहिती उत्तरादाखल आपल्याला मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे विशेषज्ञ म्हणतात.
संभाषणाच्या दरम्यान आपल्या प्रत्येक विधानानंतर ‘बरोबर आहे कि नाही?’ असा प्रश्न वारंवार विचारणे आवर्जून टाळावे. असा प्रश्न विचारला असताना समोरची व्यक्ती तुमचे म्हणणे आवडत नसताना किंवा पटत नसताना देखील तुमच्या समाधानासाठी तुमची मते मान्य करण्याची शक्यता असते. आपण केलेल्या विधानावर एखाद्या व्यक्तीचे मत जाणून घेण्यासाठी आपले विधान ‘बरोबर की चूक?’ हे विचारण्याऐवजी, ‘या बद्दल तुम्हाला काय वाटते’ हा प्रश्न, पुढील संभाषणाचा मार्ग खुला करून देणारा आहे. आपण विचारलेला प्रत्येक प्रश्न हा समोरच्या व्यक्तीची आणि पर्यायाने आपली विचार करण्याची पद्धत दाखवून देणारा असतो. त्यामुळे प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने विचारले गेले, तर समोरच्या व्यक्तीकडून मिळणारे उत्तरही समाधानकारक असते, आणि असे असले, तर दोन अनोळखी व्यक्तींमधील संभाषण देखील चांगले रंगते.

Leave a Comment