अॅलोपॅथिक सायन्ससंबधी योगगुरु रामदेव बाबांचे अवमानजनक वक्तव्य


नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी वापरली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे आएमएच्या वतीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

1200 हून अधिक डॉक्टरांनी कोरोना विरोधातील लढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. बाबा रामदेव यांनी त्यांचा अपमान केला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कोरोनाच्या भयंकर संकटाला देश तोंड देत असताना बाबा रामदेव यांनी वापरलेल्या अवमानजनक आणि असंस्कृत भाषेमुळे अनेक समस्त डॉक्टर वर्गाच्या कामामध्ये नकारात्मकता येऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.


देशातील डॉक्टर आपल्या जीवाचा विचार न करता कोरोनाच्या या काळात झोकून देऊन रुग्णांची सेवा करत आहेत आणि हे स्वयंघोषित व्यापारी बाबा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आणि तिरस्कार समाजात पसरवत आहे. तसेच डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधावर रामदेव बाबांच्या वक्तव्यामुळे परिणाम होऊ शकतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.

सध्या रामदेव बाबा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा रामदेव अॅलोपॅथिक सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसत आहेत. अॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा असल्याचे बोलताना रामदेव बाबा दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये त्यांनी अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही भाष्य केले आहे.