WHOच्या आपत्कालीन लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा नाही समावेश


नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक देशांनी प्रतिबंधात्मक लसींचा वापर वाढवत लसीकरण मोहिमेला वेग दिल्यानंतर आता काही देशांमध्ये कोरोना बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता काही राष्ट्रांनी याच धर्तीवर सशर्त आंतरराष्ट्रीय प्रवासास मान्यता दिली आहे. यामध्ये कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्यास बहुतांश राष्ट्रांनी मान्यता दिली आहे. पण, भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना यापासून मुकावे लागू शकते. कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना किमान काही महिनेतरी आंतरराष्ट्रीय प्रवास शक्य नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासाची कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्यांना मुभा न मिळण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. बहुतांश देशांमध्ये त्यांच्या प्रशासनाने मान्यता दिलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता मिळत आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या लसी घेतलेल्या प्रवाशांना प्राधान्य देण्यात येत आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत अद्यापही कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यात न आल्यामुळे ही अडचण उद्भवत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत आतापर्यंत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड, मॉडर्ना, फायझर, अस्ट्राझेन्का, (अमेरिका आणि नेदरलँड्समध्ये) जेन्सेन, सिनोफार्म/ बीबीआयपी अशा लसींचा समावेश करण्यात आला आहे. पण, यामध्ये कुठेही कोव्हॅक्सिनची वर्णी लागलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार या यादीत आपल्या लसीचा समावेश करण्यासाठी भारत बायोटेकने पुढाकार घेतला आहे, पण अद्यापही काही महत्त्वाची माहिती आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

याचसंदर्भात मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्यात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ज्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडे कंपनी डोसियर देणार आहे. प्रत्येक पायरीमध्ये काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे किमान काही आठवडे तरी कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंधने असणार आहेत.