पुणेकरांची चिंता वाढली; राज्यातील म्युकरमायकोसिस सर्वाधिक रुग्ण पुण्यात


मुंबई, : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात होते. त्यातच आता पुण्यातील कोरोनाबाघितांची संख्या कमी होत असतानाच पुन्हा पुणेकरांची चिंता वाढली आहे. कारण, पुण्यात म्युकरमायकोसिस आजाराचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या पाठोपाठ सध्या म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत.

म्युकरमायकोसिसचे 1 हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. म्युकरमायकोसिसचे पुण्यात 273 रुग्ण आहेत. त्यानंतर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 60, चंद्रपुरात 48, लातूर 28 तर ठाण्यात 22 रुग्ण आहेत.

राज्यातील शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पण, या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे एम्पोटेरेसिन इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यांत तर इंजेक्शनच उपलब्ध नाहीत. दरम्यान राज्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे काही जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. यामध्ये गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता राज्यात वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.