देशातील ही आहेत काही झपाटलेली रेल्वेस्टेशन्स

रेल्वेचे जाळे भारतभर अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेले आहे आणि रोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात तसेच हजारो टनांची मालवाहतूक रेल्वे दररोज करत असते. रेल्वे स्टेशन हा एक आगळा प्रकार असून काही स्टेशन अति व्यस्त तर काही अगदी सुनसान आहेत. देशात झपाटलेल्या रेल्वे स्टेशन बद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात आणि त्या आवडीने ऐकल्याही जातात. अशाच काही झपाटलेल्या स्टेशनची ही माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये रेल्वे तसेच उपनगरी रेल्वेचे मोठे जाळे आहे. माणसांचा महासागर असलेल्या मुंबईतील मुलुंड रेल्वेस्टेशन असेच झपाटलेले आहे. प्रवासी तसेच स्टेशनच्या आसपास राहणारे या जागेतून रात्री नेहमीच किंकाळ्या, रडण्याचे आवाज येतात असे सांगतात. रेल्वे लाईन पार करताना गाडीखाली सापडून मरण पावलेल्या लोकांचे आत्मे येथे वावरतात असे म्हणतात.

उत्तरप्रदेशातील प्रयागराज मधील नैनी जंक्शन असेच प्रसिद्ध आहे. येथे जवळच जेल आहे. असे सांगतात स्वातंत्र्यापूर्वी या जेल मध्ये अनेक स्वातंत्रसैनिक कैदेत होते आणि त्यांचा खूप छळ केला गेला. यातील काही त्या छळामुळे मरण पावले. या स्वातंत्रसैनिकांचे आत्मे या जंक्शनवर रात्री फिरत असतात. आंध्रप्रदेश मधील चीनुर रेल्वेस्थानकावर एका सीआरपीएफ जवानाचे भूत दिसते. हरिसिंग नावाचा हा जवान या स्टेशनवर उतरला होता तेव्हा त्याला रेल्वे पोलीस आणि टीटीई ने इतकी मारहाण केली की त्यात तो ठार झाला. या स्टेशनवर फिरून तो न्याय मागतो असे म्हणतात.

हिमाचल मधील सोलन भागात कालका सिमला रुटवर बरोग हे छोटेसे सुंदर स्टेशन आहे. येथे शेजारीच एक भुयार आहे. बरोग नावाच्या ब्रिटीश इंजिनीअरने हे भुयार बांधले असे मानतात. त्याने नंतर तेथे आत्महत्या केली. तेव्हापासून त्याचा आत्मा येथे आहे असे सांगितले जाते. प.बंगाल मधील पुरुलिया जिल्यात असलेले बेगुनकोडोर रेल्वेस्टेशन भीतीदायक स्टेशन मधील एक आहे. येथे अनेकांनी पांढऱ्या साडीत फिरणाऱ्या महिलेला पाहिले आहे. या स्टेशन विषयी अन्य काही भीतीदायक कथा सुद्धा सांगितल्या जातात. ४२ वर्षे हे स्टेशन बंद होते ते २००९ मध्ये पुन्हा सुरु केले गेले आहे.