जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे कर्करोगाने निधन


नवी दिल्ली : टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मोठा धक्का बसला आहे. कारण आज मेरठ येथे आपल्या घरीच भुवनेश्वरचे वडिल किरनपाल सिंग यांचे निधन झाले आहे. पोलिस विभागात काम करणारे किरनपाल सिंग हे ६३ वर्षांचे होते. किरनपाल सिंग यांना लिव्हरचा कर्करोग झाला होता.

किरनपाल सिंग हे मुळचे बुलंदशहर येथील होते, पण पोलिस विभागात कार्यरत असल्यामुळे ते मेरठ आणि मुझफ्फरनगर येथे काम करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि ते घरीच होते. पण त्यांना यावेळी लिव्हरचा कर्करोग झाला होता. यामध्येच त्यांना काविळसह अन्य काही विकारही जडले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर घरीच उपचार करण्यास सांगितले होते.

दिल्लीतील एम्स आणि नोएडामधील एका हॉस्पिटलमध्ये किरनपाल सिंग यांचे उपचार सुरु होते. डॉक्टर त्यांच्यावर उपचारही करत होते. पण काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी किरनपाल सिंग यांना घरी नेण्यास सांगितले होते. याचदरम्यान भुवनेश्वर आपल्या कुटुंबियांबरोबर वडिलांची सेवा करत होता.

२०१५ साली किरनपाल सिंग यांना जीवे मारण्याची धमी मिळाली होती. हे प्रकरण बुलंदशहर येथील जमिनीबाबत होते. किरनपाल सिंग यांना त्यावेळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भुवनेश्वर कुमार हा त्यावेळी श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. किरनपाल सिंग यांनी त्यावेळी पोलिसांची मदत मागितली होती. किरनपाल सिंग यांना जमिनीच्या या व्यवहारातून बाहेर पडण्यासाठी धमकी दिली जात होती. त्यावेळी मेरठ पोलिसांनी भुवनेश्वरच्या कुटुंबियांना संरक्षण दिले होते.