कोरोना प्रादुर्भावमुळे आशिया कप स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी रद्द


नवी दिल्ली : सर्वच क्षेत्रांवर कोरोनामुळे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशातच क्रिकेटलाही कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत अनेक क्रिकेटच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आता कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी आशिया कप टी-20 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता आशिया कप स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी एश्ले डी’सिल्वा यांनी सांगितले की, सध्याची कोरोना परिस्थिती पाहता, यंदाच्या वर्षी जूनमध्ये होणारी आशिया कप स्पर्धा खेळवणे शक्य नाही.

सप्टेंबर 2020 मध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा गेल्यावर्षीही रद्द करण्यात आली होती. ही स्पर्धा जून 2021 मध्ये खेळवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. अशातच ही स्पर्धा पुढल्या वर्षी खेळवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप यासंदर्भात आशिया क्रिकेट संघटनाच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.

या स्पर्धेबाबत आशिया क्रिकेट संघटनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की, आशिया कप स्पर्धेचे आयोजन पुढच्या वर्षी केले जाण्याची शक्यता आहे. पण स्पर्धा कुठे खेळवण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पाकिस्तानात 2020 मध्ये खेळवण्यात येणाऱ्या आशिया कपचे आयोजन करण्यात येणार होते. पण कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन यंदा श्रीलंकेत करण्यात येणार होते. अशातच पुढच्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्याची पाकिस्तानला संधी मिळू शकते किंवा पुढच्या वर्षी ही स्पर्धा दुबईत खेळवली जाऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

त्याचबरोबर भारतीय संघाच्या व्यस्त नियोजनामुळे आशिया कपवर अनिश्चिततेचे सावट होते. जून महिन्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार की, नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आयोजकांचे मोठे नुकसान झाले असते, असेही सांगण्यात येत आहे.