मुंबई २६/११ हल्ला, एनएसजी कमांडो नेते दत्ता यांचे करोनाने निधन

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजी कमांडो टीमचे नेतृत्व केलेले एनएसजीचे माजी महासंचालक जे.के. दत्ता यांचे बुधवारी दिल्ली मध्ये करोनामुळे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार दत्ता यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागल्याने त्यांना १४ एप्रिल रोजी गुरुग्राम मधील मेदंता हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. बुधवारी यांना हृदयाचा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालविली. २००६ ते २००९ या काळात ते एनएसजी प्रमुख होते. याच काळात पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी १०० वर्षे जुन्या ताज पॅलेस आणि द.मुंबईतील महत्वाच्या इमारतीत बंधक बनविलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका आणि अतिरेक्यांना हुसकून लावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी एनएसजी कमांडो पथक मुंबईत दाखल झाले होते. त्याचे नेतृत्व दत्ता यांनी केले होते.

१९७१ साली बंगाल केडर मधून आयपीएस झालेल्या ज्योती कृष्ण दत्ता यांनी सीबीआय संयुक्त संचालक म्हणूनही काम केले होते. २००० साली वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कप साठी जाताना भारताच्या टीमला एनएसजी कमांडो सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला गेला होता कारण तेव्हा कॅरेबियन बेटांवर टीमसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती. तेव्हा ही कमांडो टीम वेस्ट इंडीजला गेली होती तेव्हाही जे.के. दत्ता एनएसजीचे जनरल डायरेक्टर होते. एनएसजीची देशाबाहेर जाऊन सुरक्षा देणारी ही पहिली टीम होती.