नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंदमुळे मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम नाही


मुंबई : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी बाजार समित्या दहा दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे 12 मे ते 21 मे 2021 पर्यंत बाजार समित्याचे कामकाज बंद आहे. मात्र याचा मुंबई व उपनगरामधील भाजीपाला पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही, असा खुलासा पणन विभागाने केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 12 मे ते 21 मे 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश 12 मे, 2021 देण्यात आले आहेत. या आदेशातील परिच्छेद 3 मध्ये त्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या हितास्तव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी भाजीपाला पुरवठ्याची व्यवस्था वेगवेगळ्या स्तरावर विकेंद्रीत करुन भाजीपाला व फळे यांचा पुरवठा सुरळीत राहील, अशी व्यवस्था करावी. याच आदेशात अंतर-शहर व आंतर-जिल्ह्यात, फळे व भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध लागू नाहीत. भाजीपाला पूर्णत: नियमनमुक्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे उत्पादन आता बाजार समितीच्या यार्डमध्ये आणणे आवश्यक नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान नाही.

तसेच नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 दिवसांसाठी बंद असल्या तरी त्याचा परिणाम मुंबईतील आवक वर झालेला नाही. मुंबईतील भाजीपाल्याच्या पुरवठ्यात, नाशिक जिल्ह्यातून 15-20 टक्के या प्रमाणात होतो. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या जरी बंद असल्या तरी मुंबईला अहमदनगर, पुणे, सातारा व पालघर या जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरातील भाजीपाल्यावर परिणाम नाही.