तज्ज्ञांनी केला अमेरिकेची लस भारतातील कोरोनाच्या स्ट्रेनविरोधात अधिक प्रभावशाली असल्याचा दावा


नवी दिल्ली : अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या कोरोना लसी या भारतात सापडलेल्या B.1.617 या कोरोना स्ट्रेन विरोधात अधिक प्रभावशाली असल्याचा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील कोरोना स्ट्रेन B.1.617 व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटिनची साखळी अमेरिकेत वापरण्यात येणाऱ्या फायझर आणि मॉडर्ना या लसी तोडतात, असे लक्षात आले आहे.

कोरोना स्ट्रेनचा स्पाईक प्रोटिन हा असा हिस्सा आहे, जो कोरोनाला शरीरात पसरायला मदत करतो. जर याची साखळी तोडली तर कोरोनाचा शरीरात होणारा प्रसार थांबवता येतो. त्यामुळे नंतर या स्ट्रेनचा कोणताही परिणाम होत नाही.

अमेरिेकेचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितले की, जो भारतातील कोरोनाचा स्ट्रेन आहे, तो अधिक धोकादायक आहे. तशा प्रकारचा स्ट्रेन आणखी कुठही तयार होण्याची शक्यता असल्यामुळे कोरोनाच्या या व्हायरसला थांबवण्यासाठी कोरोनाची लस घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेत B.1.617 या भारतीय कोरोनाचा स्ट्रेन एप्रिल महिन्यात सापडला होता. त्यानंतर अनेक शहरात त्याचा प्रसार झाल्याचे लक्षात आले होते. याच कारणाने अमेरिकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता.

B.1.617 हा भारतीय स्ट्रेनला चिंताजनक स्ट्रेन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही सांगितले होतं. अमेरिकेच्या सीडीसीच्या एका अहवालानुसार, अमेरिकेत 0.7 टक्के कोरोना केसेस या भारतीय B.1.617 या स्ट्रेनच्या होत्या.

दरम्यान न्यूज एजन्सी एएनआयला एक सविस्तर मुलाखत देताना डॉ. अॅन्थनी फाऊची म्हणाले होते की, आपण जर अडचणीत असाल, जसा भारत आता आहे, त्या परिस्थितीत शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यात यावे. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर वाढवण्याचा निर्णय हा योग्यच आहे. जर आपल्याकडे लसीच उपलब्ध नसतील त्यावेळी आपण या दोन डोसमधील अंतर वाढवू शकतो. त्यामुळे मधल्या काळात मोठ्या लोकसंख्येला लस देता येऊ शकते. पण जर लसी उपलब्ध असतील, तर असे करु नये, असेही डॉ. अॅन्थनी फाऊची यांनी सांगितले.