काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही – अतुल भातखळकर


मुंबई – कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सध्या टूलकिट प्रकरणावरुन चांगलीच जुंपली आहे. त्यावरुन कॉंग्रेसला भाजपने लक्ष्य केले आहे. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेसवर आरोप केले. कॉंग्रेस कोरोनाच्या संकट काळातही राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कॉंग्रेसवर गंभीर टीका केली आहे.


काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते, असा आरोप अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.


भारताचा नंबर 1 शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी करोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?, असा सवाल देखील अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आहे.


तर दूसरीकडे कॉंग्रेसने कोरोना महामारीच्या वेळी ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग केला. कोरोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. परदेशी पत्रकारांच्या मदतीने कॉंग्रेसने भारताची बदनामी करण्याची कसलीही कसूर सोडली नाही.

नन
याप्रकरणी पलटवार करत भाजपचे आरोप बिनबुडाचे असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.