दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर


मुंबई – राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला असून हा लॉकडाऊन अजूनही राज्यात सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राज्यात नागरिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

आज आलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात राज्यात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पण, त्याचवेळी ५२ हजार ८९८ रुग्ण कोरोनामुक्त बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० एवढा झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर पोहचला आहे.

दरम्यान, एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातील मृत्यूदर मात्र कमी होत नाही. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. आरोग्य विभागाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ एवढा झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात आज सापडलेल्या २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५४ लाख ३३ हजार ५०६ एवढा झाला आहे. त्यापैकी ४ लाख १९ हजार ७२७ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ कोरोना चाचण्या केल्या असून त्यापैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७.२ टक्के नोंदवण्यात आला आहे.

दुसरीकडे मागील २४ तासांत पुण्यात १ हजार ०२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६१ हजार ००८ एवढी झाली आहे. त्याचवेळी पुण्यात आज दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा देखील वाढून ७ हजार ७९५ एवढा झाला आहे. पुण्यात मागील २४ तासात २ हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत अशा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ लाख ३६ हजार ६९० इतकी झाली आहे.