17 मे 2021 पर्यंत महाराष्ट्रात झाले दोन कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण


मुंबई : 16 जानेवारीपासून महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरु झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेनुसार, 17 मे 2021 पर्यंत एकूण 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर 17 मे 2021 रोजी राज्यात एकूण 1239 लसीकरण सत्रे आयोजित करुन एकूण 99, 699 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या कामगिरीबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र कोरोना लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

राज्य सरकारने लसीच्या तुटवड्याचा दाखला देत 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरणं थांबवले. या वयोगटासाठीच्या लस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत राज्यात 23 लाख 23 हजार 322 फ्रण्ट लाईन वर्कर्सना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 18 लाख 50 हजार 773 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला आणि दुसरा डोस दिला आहे. याशिवाय 18 ते 44 वर्षे वयोगटातील 6 लाख 55 हजार 685 लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 45 वर्षांवरील वयोगटातील 1 कोटी 52 लाख 60 हजार 528 नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आतापर्यंत मुंबईत 28 लाख 92 हजार 457 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात 26 लाख 17 हजार 053 जणांनी लस घेतली आहे. याशिवाय ठाण्यात 15 लाख 28 हजार 734, नागपूर 12 लाख 20 हजार 752 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 11 लाख 39 हजार 682 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.