इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना कंगना म्हणते, बाळांनो मी सर्वांची आई असल्यामुळे यापुढे लायकीत रहायचे


अभिनेत्री कंगना राणावतला सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. कंगनाने देखील त्यावर ट्रोलर्सना बऱ्याचदा सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतीच इंस्टाग्राम अकाउंटवर कंगनाने एक पोस्ट शेअर केली आहे. यात इस्त्रायलबद्दल कंगनाला असलेल्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्संना तिने सडेतोड उत्तर दिले आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरू असलेल्या वादावर आपले मत मांडत आहे.

सध्या इस्त्रायलवरील वक्तव्यावरून ट्रोल करणाऱ्यांचा कंगना समाचार घेत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट कंगनाने शेअर केली. यात ती म्हणाली, सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की इस्त्रायलची स्थापना अगदी योग्यरीत्या झाली आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवत त्यांनी युनायटेड नेशनच्या मदतीने या देशाची स्थापना केली आहे. त्यांच्यावर सहा मुसलमान देशांनी आक्रमण केली. त्यांनी या आक्रमणामध्ये प्रत्येक वेळी देशाच्या विविध भागावर ताबा मिळवला. अर्थातच तुम्ही जेव्हा युद्ध जिंकता तेव्हा असेच होते. जे लोक रडत आहेत आणि म्हणत आहेत की मला काही माहीत नाही, तर बाळांनो मी सर्वांची आई असल्यामुळे यापुढे लायकीत रहायचे.


कंगना पुढे म्हणाली, असे कसे तुम्ही इस्त्रायलला बेकायदेशीर म्हणू शकता. त्यांचे या जगात स्थान नाही का? सर्व जगाला मूर्ख बनवून ठेवले आहे. फक्त गुंडगिरी करायची आणि समोरून कुणी केली तर रडून गोंधळ घालायचा. संपूर्ण जगाला डोक्यावर घ्यायचे. मूर्ख लोकांचा आणि मीडियाचा वापर करून गोंधळ निर्माण करायचा. जरा लाज बाळगा तुमचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश झाला आहे आणि माझ्याबद्दल जर बोलाल तर तुम्हाला नागडे करून टाकेन, असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांची कंगनाने बोलती बंद केली आहे.