पदोन्नतीमधील आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांनंतर, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र


सांगली : सध्या राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा पत्रप्रपंच चर्चेचा विषय ठरत आहेत. पडळकर वेगवेगळ्या विषयावरून सतत कुणा ना कुणाला पत्र लिहत असतात. पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र धाडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र पदोन्नतीमधील आरक्षण रद्दच्या विषयावरून अजित पवार यांना लिहले असून आरक्षणाची गळचेपी करणारा शासन निर्णय काढणाऱ्या प्रस्थापितांच्या महाविकास आघाडी सरकारचा आपण निषेध, धिक्कार करत असल्याचा उल्लेख गोपीचंद पडळकर यांनी या पत्रात केला आहे. आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? की बारामतीची जहागिरी? असाही सवाल पडळकर यांनी पत्राच्या माध्यमातून अजित पवार यांना विचारला आहे.

तुमच्याच पई पाव्हण्यांचा आणि त्यांच्याच हिताचा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याविषयी माझी काही तक्रार नाही, असा टोला लगावत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना कदाचित तुम्हाला तुमच्या मर्जीतील काही खास अधिकाऱ्यांचीच सोय लावून टक्केवारी सरकारची वसूली वाढवायची म्हणून हा निर्णय घेतला असावा असा टोला लगावला आहे. आता या पत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गोपिचंद पडळकर यांनी अजित पवार यांना लिहिले पत्र