वर्किंग कपल्सनी अशा प्रकारे घ्यावा सहजीवनाचा आनंद


एक काळ असा होता, जेव्हा पुरुषांनी करायची आणि बायकांनी करायची कामे ठरलेली होती. किंबहुना लहानपणापासून त्यांच्यावर संस्कारही तसेच केले जात असत. मुली म्हटल्या की जमेल तेवढे शिक्षण आणि ते सांभाळून घरातल्या कामांसाठी वेळ देणे आणि मुलगे म्हटले की शिक्षण पूर्ण करून, चांगली नोकरी मिळवून स्वतःच्या पायांवर उभे राहणे असे ‘कंडीशनिंग’ लहानपणापासूनच होत असे. त्या काळी मुली शिकत असत, नोकरीही करीत असत. पण नोकरी ही त्याकाळी निदान स्त्रियांसाठी तरी प्राथमिकता मानली जात नसे. काळ बदलला तशी ही विचारसारणी बदलली. मुलींना देखील शिक्षणाच्या उत्तम संधी मिळू लागल्या, मुलींनी केवळ घरकामामध्ये स्वतःला गुंतवून न घेता काही तरी वेगळे करून दाखवावे ही मुलींना प्रोत्साहित करणारी मानसिकता आढळून येऊ लागली.

आताच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर आता केवळ पुरुष करू शकतील आणि स्त्रिया करू शकणार नाहीत असे एकही काम राहिले नाही. आजची स्त्री एक कर्तव्यदक्ष, सुशिक्षित नागरिक आहे. आजकालच्या तरुणांना देखील उच्चशिक्षित, उत्तम पगाराची नोकरी असणारी सहचारिणी हवी असते. मनासारखी जोडीदारीण मिळतेही, पण नोकरी सांभाळताना घरकाम, इतर जबाबदाऱ्या जर कोणा एकाच्याच वाट्याला अधिक येऊ लागल्या, तर या सर्व धावपळीशी जुळवून घेताना सहजीवनाचे गणित कुठे तरी चुकू लागते. लग्नानंतर आपापली करीयर्स सांभाळताना आपले सहजीवनही चांगले राहील हे पाहण्याची जबाबदारी पती आणि पत्नी दोघांची असते. जर सहजीवन समाधान देणारे नसेल तर याचे दुष्परिणाम व्यक्तिगत जीवनावर आणि पर्यायाने कामावरही दिसून येऊ लागतात. त्यामुळे सहजीवन सुखी आणि समाधानी असावे या करिता पती व पत्नी दोघांनी प्रयत्नशील असायला हवे.

आताच्या काळामध्ये घरातील कामांचा भार उचलण्याची जबाबदारी केवळ एकट्या पत्नीची नसून, पतीची देखील आहे. आताच्या काळामध्ये अनेक पुरुष स्वखुशीने घरातील कामांची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने उचलताना पहावयास मिळतात. त्यामुळे जबाबदारीचे ओझे जर एकसमान वाटले गेले तर त्यामुळे वेळेची बचत होते, आणि एकमेकांच्या मदतीने जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पाडता येणे शक्य होते. आठवड्याभराच्या धावपळीनंतर वर्किंग कपल्सनी शनिवार-रविवारच्या सुट्टीतील काही वेळ शक्यतो एकमेकांसोबत घालवायला हवा. वर्किंग कपल्स असतील, तर शनिवार-रविवारचा दिवस साहजिकच आठवड्याभराची घरातली कामे, नात्यातील काही खास प्रसंग, गाठीभेटी, मुलांच्या सहवासामध्ये घालवितानाच थोडा वेळ एकमेकांसाठी देणे ही आवश्यक आहे. त्यामुळे दाम्पत्यामध्ये संवाद टिकून राहतो.

कामाच्या, घराच्या जबाबदारीसोबतच मुलांची जबाबदारीही महत्वाची असते. अनेकदा पती किंवा पत्नी यांपैकी एकच कोणीतरी मुलांना जास्त वेळ देते, आणि दुसरा मुलांना म्हणावा तसा वेळ देऊ शकत नाही. अशा वेळी मुलांची जबाबदारी एकट्यानेच घेणाऱ्यावर त्याचा मानसिक ताण जास्त असतो. परिणामी वाद वाढतात. विशेषतः वाढत्या वयातील मुले असतील, तर त्यांना वेळोवेळी सल्ल्याची, योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ही जबाबदारी एकट्या आईची किंवा एकट्या वडिलांची नाही. मुलांच्या आयुष्यामध्ये आई आणि वडील या दोघांचे स्थान तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे आपले काम सांभाळताना मुलांसाठी वेळ देणे, त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणे महत्वाचे ठरते.

पती आणि पत्नी यांनी आपापले कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवायला हवे. घरातील वादविवादांच्या मुळे ऑफिसमधील कामावर परिणाम होणे किंवा ऑफिसच्या कामांमुळे घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे या दोन्हींचा दुष्परिणाम सहजीवनावर होत असतो. त्यामुळे घरात असताना शक्यतो ऑफिसचे काम करणे, किंवा सातत्याने ऑफिसच्या कामानिमित्तान पुष्कळ वेळ चालणारे फोनवरचे संवाद कमी करण्याकडे कल असावा. निदान एकमेकांसोबत, मुलांसोबत वेळ घालवताना ऑफिसचे काम शक्यतो बाजूला ठेवलेले असावे.

Leave a Comment