वर्षातून केवळ पाचच तास खुलणारे निरई माता मंदिर


भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याशी अनेक तऱ्हेची रोचक परंपरा निगाडित आहेत. किंबहुना अनेक मंदिरे तर त्यांच्याशी निगडित असलेल्या परंपरांमुळे अधिक प्रसिद्ध झाली आहेत. याच मंदिरांपैकी एक आहे निरई माता मंदिर. या मंदिराशी निगडीत असलेल्या अनोख्या परंपरेच्या अनुसार हे मंदिर वर्षातून केवळ पाचच तास भाविकांसाठी खुले करण्यात येते. तसेच येथे दर्शनाच्या उद्देशाने येणाऱ्या भाविक महिलांसाठीही काही खास नियम आहेत.

निरई माता मंदिर छत्तिसगढ जिल्ह्यातील गरियाबंद जिल्हा मुख्यालयापासून सुमारे बारा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मोहेरा ग्राम पंचायतीच्या आखत्यारीत असलेल्या निरई गावातील एका डोंगरावर आहे. वास्तविक येथे मंदिर म्हणावे अशी वस्तू नाही, तर डोंगरावर एका विशिष्ट ठिकाणी देवीचा वास असल्याचे मानले जात असून, या ठिकाणी पूजा-अर्चना केली जाते, म्हणून या ठिकाणाचा उल्लेख ‘मंदिर’ असा केला जातो. बहुतेक सर्व मंदिराच्या प्रमाणे याही मंदिरामध्ये श्रीफळ आणि उदबत्त्या देवीला अर्पण केल्या जातात, पण कुंकू, गुलाल, इतर सौभाग्यलेणी, यांसारख्या वस्तू या मंदिरामध्ये आणण्यास बंदी आहे. इतर मंदिरांच्या प्रमाणे निरई माता मंदिर वर्षाचे सर्व दिवस खुले राहत नसून, वर्षातील एकच दिवस हे मंदिर पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत दर्शनास खुले असते. केवळ पाचच तास दर्शनासाठी खुलणाऱ्या या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी दर वर्षी पहावयास मिळते. चैत्र नवरात्रातील पहिल्या रविवारी हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. बाकी दिवशी या ठिकाणी कोणीही येण्यास मनाई आहे.

या मंदिराची खासियत अशी, की चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये या मंदिरामध्ये एक दिवाज्योत आपोपाप प्रज्वलित होत असल्याचे म्हटले जाते. चैत्र नवरात्रीच्या दिवसांमध्ये स्वतः देवी निरई या मंदिरामध्ये अवतरत असून त्यामुळे ही ज्योत प्रज्वलित होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. ही ज्योत विना तेल घालताही नऊ दिवस प्रज्वलित राहते. वास्तविक या मंदिरामध्ये देवीची मूर्ती नाही, किंवा येथे मंदिरासमान वास्तूही नाही, पण केवळ अपार श्रद्धेच्या जोरावर हजारो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात. ज्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी खुले होते, त्यादिवशी हजारो बकऱ्यांचा बळी येथे दिला जातो. येथे येणारे भाविक देवीला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर या ठिकाणी ज्योत प्रज्वलित करतात.

या मंदिरामध्ये महिलांचा प्रवेश निषिद्ध मानला गेला असून, येथे करावयाची पूजा केवळ पुरुषांकडूनच केली जाते. महिलांनी या मंदिरामध्ये प्रवेश करणे वर्ज्य आहेच, पण त्याशिवाय महिलांनी या मंदिराचा प्रसाद सेवन करणेही निषिद्ध मानले गेले आहे. जर महिलांनी या मंदिरामध्ये प्रवेश केला, किंवा या मंदिराचा प्रसाद सेवन केला, तर काहीतरी अघटित, अशुभ घडते अशी मान्यता येथे रूढ आहे.

Leave a Comment