या महिला आहेत ‘जरा हटके’


या जगामध्ये अशा अनेक महिला आहेत, ज्यांचे व्यक्तिमत्व सामान्य महिलांच्या मानाने काहीसे ‘हटके’ म्हणायला हवे. यांपैकी काही महिला जन्मतःच स्वतःसोबत या खासियती घेऊन आल्या आहेत, तर काहींनी जाणून बुजून आपली व्यक्तिमत्वे, आपले रूप बदलून टाकले आहे. त्रिनिदाद अँड टोबेगो येथे जन्मलेली आशा मंडेला गेल्या पस्तीस वर्षांपासून अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. जगामध्ये सर्वात लांब केस असणारी महिला असल्याचा विक्रम आशाच्या नावे नोंदलेला आहे. आशा मंडेला यांच्या केसांची लांबी सुमारे वीस फुट असून, आपले केस धुवून वाळविण्यासाठी त्यांना अनेक तास खर्च करावे लागत असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची रहिवासी जुलिया ग्नुसे या महिलेला पॉरफिरीया नामक त्वचारोग होता. या विकारामुळे अगदी थोड्याशा सूर्यप्रकाशामुळे तिच्या त्वचेवर भाजल्या प्रमाणे जखमा होत असत. या जखमांचे व्रण लपविण्यासाठी जुलियाने स्वतःच्या शरीरभर टॅटू बनवून घेतले होते.

अनेटा फ्लोरचेक ही पोलिश महिला जगातील सर्वात ताकदवान महिला म्हणून ओळखली जाते. एखाद्या बलाढ्य पुरुषाला आपल्या दोन्ही हातांनी सहज उचलून घेणारी अशी ही महिला आहे. मारिया क्रिस्टर्ना ही मेक्सिकन महिला प्रथमदर्शनी अतिशय भयावह वाटते. मारियाचे खासगी आयुष्य अनेक दुःखांनी भरलेले होते. अनेक वर्षे माता-पित्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकीतून सुटका करून घेत मारियाने विवाह केला खरा, पण हा विवाहही असफल ठरला. त्यानंतर मारियाने आपल्या चेहऱ्यासमवेत संपूर्ण शरीरावर टॅटू बनविले आणि आपल्या डोक्यावर एखाद्या जनावराला असतात त्याप्रमाणे शिंगेही इम्प्लांट करविली. मारियाचे हे रूप पाहून तिला प्रथमच भेटणाऱ्यांना धक्का बसत असला, तरी आता तिच्या परिचितांना तिचे हे रूप सवयीचे झाले आहे.

मँडी सेलर्स ही इंग्लंडमधील लॅन्कशरची निवासी असणारी महिला एका विचित्र, दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. या विकारामुळे मँडीच्या पायांची वाढ असामान्य पद्धतीने झाली असून, तिचे पाय अतिशय बेडौल झाले आहेत. तिच्या एका पायाचे वजन तब्बल ९५ किलो आहे. २०१० साली तिच्या पायांवर शस्त्रक्रिया केली जाऊन तिचा पाय ‘अँम्प्यूटेट’ करण्यात आला होता. तरीही या पायाची वाढ आजतागायत सुरूच आहे.

Leave a Comment