हे पुस्तक आहे विषारी !


‘शॅडोज ऑफ द वॉल्स ऑफ डेथ’ हे पुस्तक १८७४ साली छापले गेले. साधारण बावीस इंच रुंदी आणि तीस इंच लांबी असलेल्या या पुस्तकाच्या दोन खासियती आहेत. एक म्हणजे, या पुस्तकामध्ये शंभराहून अधिक केवळ वॉलपेपर्सचे नमुने आहेत, आणि दुसरी आणि मुख्य खासियत अशी, की या पुस्तकाला स्पर्श केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, इतके हे पुस्तक विषारी आहे. याचे कारण हे, की शंभरहून अधिक वॉलपेपर्सचा संग्रह असणाऱ्या या पुस्तकातील प्रत्येक वॉलपेपर आर्सेनिक नामक अतिशय घातक विषाने भरलेला आहे.

वॉलपेपर्सचा हा संग्रह मिशिगन राज्य कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर रॉबर्ट केडझी यांनी केला होता. १८७०च्या काळामध्ये घरांच्या सजावटीसाठी वॉलपेपर्स लोकप्रिय होत असतानाच, यामध्ये आर्सेनिक विषाचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जात असल्याचे आढळून आल्याने या वॉलपेपर्सच्या वापरासंबंधी सामान्य नागरिकांना धोक्याची सूचना दिली जाण्याकरिता या विषारी वॉलपेपर्सचा संग्रह डॉक्टर केडझी यांनी केला होता. आर्सेनिक हे विष घातक असतानाही याचा उपयोग अनेक सुंदर रंग बनविण्याकरिता केला जात असे. हेच रंग आकर्षक वॉलपेपर्स तयार करण्याकरिता वापरले जात असत. एकोणिसाव्या शतकामध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशनद्वारे केल्या गेलेल्या संशोधनामध्ये एकूण उत्पादित वॉलपेपर्सपैकी पासष्ट टक्के वॉलपेपर्समध्ये आर्सेनिक असल्याचे म्हटले गेले होते.

व्हिक्टोरियन काळामध्ये आर्सेनिक हे जहाल विष असल्याचे ज्ञान सर्वश्रुत होते. किंबहुना हे खाल्ले गेल्याने मृत्यू होऊ शकतो हे ज्ञानही सामान्यांना असले, तरी आर्सेनिकचा वापर रंग किंवा वॉलपेपर्स बनविताना केला तर तेही तितकेच धोकादायक असू शकतात याची कल्पना मात्र सर्वसामान्यांना नसावी. त्यामुळे घरांच्या सजावटीसाठी आर्सेनिक युक्त रंग किंवा वॉलपेपर्सचा वापर सर्रास केला जात असे. रंगांमध्ये किंवा वॉलपेपर्समध्ये असलेले आर्सेनिक घरातील हवा दूषित करीत आहे हे लोकांना ठाऊकच नव्हते. त्यामुळे घरातील एखादी व्यक्ती अचानक आजारी का दिसू लागली हे त्या रुग्णाला, त्याच्या नातेवाईकांना आणि खुद्द डॉक्टरनाही कळत नसे. त्यामुळे आजारपण ओढविले असताना आर्सेनिकमुळे दूषित झालेल्या हवेमध्ये सतत राहिल्याने रुग्णांचे आजारपण आणखीनच वाढत असल्याचेही डॉक्टर केडझी यांनी संशोधनाद्वारे सिद्ध केले.

अशा विषारी वॉलपेपर्सच्या वापराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आपल्या संशोधनाचा भाग म्हणून केडझी यांनी अशा विषारी वॉलपेपर्सचे संग्रह तयार करून मिशिगन राज्यातील निरनिराळ्या सार्वजनिक वाचनालयांना पाठविले. त्यासोबत आरोग्य विभागाचे पत्र, हा संग्रह पाठविण्यामागचा उद्देशही त्यांनी कळविला होता. तसेच हा संग्रह हाताळताना हातांमध्ये हातमोजे घालण्याबद्दल आणि लहान मुलांना संग्रह हाताळू न देण्याबद्दलच्या सूचनाही पाठविण्यात आल्या होत्या. असे शंभर संग्रह डॉक्टर केडझी यांनी तयार केले होते, त्यापैकी आता केवळ चार संग्रह अस्तित्वात आहेत. अनेक वाचनालयांनी असे संग्रह बाळगण्यातील धोका लक्षात घेऊन हे संग्रह नष्ट केले होते. आता केवळ चार मूळ संग्रह उरले असून हे सर्व संग्रह मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे आहेत.

Leave a Comment