भाडे परवडत नसल्याने या ठिकाणी चक्क पिंजऱ्यांंमध्ये राहतात लोक


आतापर्यंत पाळीव प्राणी किंवा एखाद्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांसाठी पिंजरे बनवून त्यामध्ये ते प्राणी ठेवले गेले असल्याचे आपण नेहमीच पहात असतो. मात्र प्राण्यांच्या प्रमाणे सामान्य माणसाला देखील पिंजऱ्यामध्ये राहण्याची वेळ आली आहे, हे ऐकून आपल्याला खरे वाटणार नाही, पण हे वास्तव आहे. हॉंग कॉंग हा प्रांत जगातील सर्वात महागडा प्रांत म्हणून ओळखला जातो. येथे मूलभूत सुविधांसाठी देखील नागरिकांना भरपूर पैसे मोजावे लागत असतात. त्यामुळे या प्रांतामध्ये स्वतःच्या मालकीची राहती जागा असणे, हे येथील नागरिकांना स्वप्नवत वाटते, कारण सामान्य नागरिकांना स्वतःचे घर खरेदी करणे येथे अशक्यप्राय गोष्ट आहे.

इतकेच नाही, तर राहण्यासाठी जागा भाड्याने मिळणेही इथे तितकेच दुर्लभ आहे, कारण जागेचे घरभाडे देखील या ठिकाणी सहज परवडण्यासारखे नसल्याने भरमसाट भाडे, आणि त्यामध्ये केवळ एक लहानशी अपार्टमेंट हे दृश्य येथे सर्रास पहावयास मिळत असते. त्यातून ज्या लोकांना एका अतिशय लहान घराचे घरभाडे ही परवडत नाही, ते लोक या प्रांतांमध्ये, चक्क पिंजऱ्यांमध्ये राहताना दिसतात. पण आश्चर्याची गोष्ट अशी, की राहण्यासाठी हे पिंजरे देखील येथे सहजासहजी उपलब्ध नाहीत.

अशा एका पिंजऱ्याची किंमत येथे अकरा हजार रुपये असून, असे पिंजरे, पडीक घरांमध्ये, जर्जर झालेल्या इमारतींमध्ये ठेवले जातात. एका लहानशा अपार्टमेंटमध्ये असे अनेक पिंजरे ठेवले जातात, आणि या प्रत्येक पिंजऱ्यामध्ये एक-एक व्यक्ती रहात असते. या लहानशा अपार्टमेंटमध्ये बाथरूम्स केवळ दोनच असून, या सर्व पिंजऱ्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना केवळ दोनच बाथरूम्समध्ये आपली नित्यकर्म उरकावी लागतात. या पिंजऱ्यांमध्ये लोक झोपण्यासाठी केवळ एक चटई अंथरतात. अशा पिंजऱ्यांमधे राहणे किती कठीण असेल याची कल्पना आपल्याला अस्वस्थ करणारी असली, तरी येथील लोकांकडे या पिंजऱ्यांमध्ये राहण्याशिवाय दुसरे कोणतेच गत्यंतर नाही हे वास्तवही भयाण आहे.

Leave a Comment