तुम्ही चाखून पाहिलात का ‘मँँगो लाडू’?


सध्या आंब्याचा मोसम आहे. अगदी कैरीच्या पन्ह्यापासून आंबा आईस्क्रीम ते आमरसापर्यंत आंबा आपल्या आहाराध्ये या दिवसांमध्ये दररोजच समाविष्ट होत असतो. वर्षातून एकदाच येणारे, अवीट गोडीचे हे फळ. त्यामुळे शक्य तितक्या निरनिरळ्या प्रकारे हे फळ आहारामध्ये समाविष्ट केले जात असते. त्याच अनुषंगाने जाणून घेऊन या आंब्यापासून बनविला जाणारा आणखी एक पदार्थ. तो पदार्थ म्हणजे ‘मँगो लाडू’, म्हणजेच आंब्यापासून बनविलेला लाडू.

हा पदार्थ बनविण्यासाठी अर्धा किलो आमरस, दोनशे ग्राम जाड बेसन (जाडसर दळलेले चण्याचे पीठ), पाव किलो पिठीसाखर, दोनशे ग्राम साजूक तूप, एक वाटी ताजी साय किंवा क्रीम, एक वाटी रवा, एक चमचा वेलची पूड, आणि अर्धी वाटी बारीक तुकडे केलेला सुकामेवा, या साहित्याची आवश्यकता असते. सुक्यामेव्यामध्ये काजू, किशमिश आणि बदाम यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

हे लाडू बनविण्यासाठी सर्वप्रथम एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करावे. तूप वितळले की त्यामध्ये चण्याच्या डाळीचे पीठ आणि रवा घालून हे एकत्र मंद आचेवर परतावे. बेसन आणि रवा हलका गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा. बेसन आणि रवा भाजल्याचा खमंग वास येऊ लागला, की त्यामध्ये आमरस घालून सावकाश ढवळून घ्यावे. या मिश्रणामध्ये गुठळ्या होऊ देऊ नयेत. जेव्हा हे मिश्रण व्यवस्थित फुलून येण्यासाठी त्यामध्ये साय किंवा क्रीम घालावे. हे मिश्रण चांगले आटून येईपर्यंत परतत रहावे. मिश्रण आटले, की कढईमधून काढून एका ताटामध्ये थंड होण्यास पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाले, की त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पूड आणि सुक्यामेव्याचे तुकडे मिसळावेत. मिश्रण चांगले एकजीव करून त्याचे मध्य आकाराचे लाडू वळावेत.

Leave a Comment