तुम्ही खरेदी केलेले कलिंगड कृत्रिम रित्या तर पिकविले गेले नाही ना ?


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगडाला मोठी मागणी असते. या दिवसांमध्ये कलिंगडाच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये उद्भविणारी पाण्याची कमी दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत कलिंगडामध्ये अ, क, ड, बी ६ जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, इत्यादी पोषक जीवनसत्वे असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणविणारा थकवा कलिंगडाच्या सेवनाने त्वरित दूर होण्यास मदत होत असते. कलिंगडामध्ये ९४ टक्के अंश पाण्याचा तर उर्वरित सहा टक्के अंश साखरेचा असतो. कलिंगड खरेदी करताना ते कशा प्रकारे खरेदी केले जावे याचे काही निश्चित आडाखे आहेतच, पण त्याशिवाय आपण खरेदी करीत असलेले कलिंगड कृत्रिम रित्या तर पिकविले गेले नाही ना, याची खातरजमा करून घेणेही अतिशय आवश्यक असते.

आजकाल भाज्या किंवा फळे वेळेआधी लवकर पिकावीत यासाठी निरनिराळ्या रसायनांचा प्रयोग यासाठी केला जात असतो. भाज्या आणि फळांना रासायनिक इंजेक्शने देऊन या भाज्या आणि फळे आकाराने मोठी केली जात असतात. अनेकदा फळांचे किंवा भाज्यांचे रंग उत्तम दिसावेत या करिताही कृत्रिम रंगांचा वापर करण्यात येत असतो. कलिंगडाच्या बाबतीतही असेच होते, कलिंगडाचा रंग लालबुंद दिसावा या करिता कलिंगडामध्ये इंजेक्शनद्वारे रसायने इंजेक्ट केली जात असतात. अशा प्रकारची इंजेक्शने आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. केवळ कलिंगडामधेच नाही, तर आंबे, केळी, आणि तत्सम फळे जलद पिकविण्यासाठी कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रास केला जात असतो.

कलिंगडाची वेल जमिनीवर पसरलेली असते. ज्या ठिकाणी कलिंगड जमिनीवर टेकलेले असते, तेथील रंग काहीसा पिवळसर दिसतो. त्यामुळे असा पिवळसर झालेला भाग कलिंगडावर न दिसता त्याचा रंग सगळीकडून एकसारखा असल्याचे दिसले, तर ते कलिंगड कृत्रिम रित्या पिकविले गेले असण्याची शक्यता विचारात घेऊन असे कलिंगड खरेदी करण्याचे टाळावे. तसेच कलिंगड घरी आणल्यानंतर त्याचा लहानसा तुकडा कापून तो पाण्यात बुडेल इतपत पाणी भांड्यामध्ये घालावे. जर कलिंगड लाल दिसावे या करिता कृत्रिम रंग वापरण्यात आला असेल, तर कलिंगडाचा तुकडा पाण्यामध्ये बुडविल्याच्या काही मिनिटांच्या नंतर पाण्याचा रंग लालसर गुलाबी दिसू लागेल. अशा वेळी कलिंगडामध्ये कृत्रिम रंग असल्याचे ओळखावे. त्याचप्रमाणे कलिंगडाची गोडी नैसर्गिकरित्या नेहमीच माफक असते. त्यामुळे अतिगोड चवीची कलिंगडे टाळावीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment