‘सिलिका जेल’चे असे ही फायदे


बाजारातून नवी हँडबॅग, सुटकेस, शूज, किंवा एखादे विद्युत उपकरण खरेदी केले की त्याच्या पॅकेजिंगमध्ये लहान लहान पॅकेट्स ठेवलेली आढळतात. ही पॅकेट्स कसली आहेत हे अनेक लोकांना ठाऊक नसल्यामुळे निरुपयोगी वस्तू म्हणून ही पॅकेट्स टाकून दिली जातात. मात्र ही पॅकेट्स सिलिका जेलची असून ती अत्यंत उपयुक्त असतात. कोणत्याही वस्तूमध्ये दमटपणा येऊ न देता आर्र्कता शोषून घेऊन वस्तू संपूर्णपणे कोरडी ठेवण्याचे काम हे सिलिका जेल करीत असते.

अनेकदा आपण महत्वाची सर्व कागदपत्रे एखाद्या ब्रीफकेसमध्ये, किंवा फोल्डरमध्ये एकत्र ठेवतो. ही ब्रीफकेस वारंवार उघडली जातेच असे नाही. अशा वेळी त्यातील आर्द्रतेमुळे त्यामधील कागदपत्रे पिवळसर पडू लागतात, तर कधी या कागदांना वाळवी लागते. अशा वेळी या ब्रीफकेसमध्ये सिलिका जेलची पॅकेट्स ठेवावीत. त्यामुळे ब्रीफकेस किंवा फोल्डरमधील आर्द्रता शोषली जाऊन कागदपत्रे सुरक्षित राहतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकरीच्या कपड्यांची आवश्यकता नसल्याने हे कपडे एखाद्या सुटकेसमध्ये पॅक करून ठेवले जातात. त्याचप्रमाणे काही खास प्रसंगी घालण्याचे कपडेही सुटकेसमध्ये किंवा बॉक्सेसमध्ये ठेवले जातात. या सुटकेसमध्ये किंवा बॉक्सेस मध्ये दमटपणामुळे कपड्यांना वास येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी सुटकेस किंवा बॉक्सेसमध्ये सिलिका जेल घालणे फायद्याचे ठरते.

हवेतील दमटपणामुळे इमिटेशन ज्वेलरी काळी पडू लागते. अशा वेळी सर्व इमिटेशन ज्वेलरी एकाच डब्यामध्ये न ठेवता, प्रत्येक आभूषण कोरड्या सुती कपड्यामध्ये लपेटून लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवावे, व ज्या मोठ्या डब्यामध्ये ही सर्व आभूषणे ठेवायची, त्यामध्ये सिलिका जेलची पॅकेट्स घालून ठेवावीत.

Leave a Comment