मराठा आरक्षण ; दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का? सदाभाऊ खोत यांची टीका


मुंबई : आमदार सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. पण सत्तेत हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. न्यायालयात राज्य सरकारने योग्यरित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांना सोबत घेतले नाही, वकिलांना मार्गदर्शन केले नाही. गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावे जोडले नसल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले, तुम्ही फार हुशार आहात. तुमचा ‘आदर्श’ घेण्यासारखा आहे. दोन वर्षे अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होते का? केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुन्हा गेले. राज्य सरकार का पुन्हा न्यायालयात गेले नाही? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.

आरक्षण सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना द्यायचे नाहीत. अशोक चव्हाण तुम्ही वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत आला आहात. अशोक चव्हाण यांना देण्यात आलेल्या जबाबदारीवरून बाजूला करा. प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्र्यांनी उपसमितीचा अध्यक्ष करू नये. या समितीवर या धनदांडग्या नेत्यांना ठेऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली.