रेमडेसिवीरनंतर आता बाजारातून गायब झाले म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन


नवी दिल्ली : एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) रुपाने नवीन संकट देशासमोर उभे राहिले आहे. सध्या बाजारात म्युकरमायकोसिसवर मिळणारे इंजेक्शन, Liposomal amphotericine B बाजारात उपलब्ध होत नसून त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला त्या पद्धतीनेच आता म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की या आधी यावरच्या इंजेक्शनची मागणी जास्त नव्हती. त्यामुळे त्याचे उत्पादनही अत्यंत कमी प्रमाणात केले जायचे. आता अचानक एवढी मागणी वाढली आहे की त्या प्रमाणात सध्या पुरवठा होत नसल्यामुळे याचा साठेबाजार होत असून ते बाजारातून गायब झाले आहे.

या इंजेक्शनसाठी लागणारा कच्च्या मालाची कमतरता असल्यानेही याचे उत्पादन कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. म्युकरमायकोसिसवर मिळणारे इंजेक्शन, Liposomal amphotericine B ची किंमत जवळपास पाच ते आठ हजारांच्या घरात आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकांमध्ये म्युकरमायकोसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. खासकरून, ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांना या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.