नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र होणार ‘अम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचे उत्पादन


वर्धा : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात कोरोना काळात महत्वाचे ठरलेल्या रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु झाले आहे. वर्ध्यात रेमडेसिवीरनंतर आता अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शन बनविण्यास देखील मंजुरी मिळाली आहे. अम्फोटेरिसिन बी उत्पादनास महाराष्ट्र सरकारच्या वतीने परवानगी मिळाली असल्याची माहिती जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला येत्या 15 दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

म्युकरमायकोसिसवर म्हणजेच ब्लॅक फंगसवर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन उपयोगी आहे. त्याच्या उत्पादनाला लवकरच सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार असल्चाचे डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. या इंजेक्शनचे उत्पादन करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी परवानगी मिळाली आहे. अम्फोटेरिसिन बी औषधाची नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने निर्मिती येथे होणार आहे. दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉ. क्षीरसागर यांनी दिली आहे.

कोरोनाकाळात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या जीवघेण्या आजारावर प्रभावी म्हणून अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. 7 हजार रुपये किंमत असलेले हे इंजेक्शन काळाबाजार करुन महागड्या दराने विकले जात असल्याचे बोलले जाते.

एका रुग्णाला गरज लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या 30 ते 50 च्या जवळपास आहे. इंजेक्शनची गरज बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेसने हे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन बनविण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

जेनेटिक लाईफ सायन्सेसला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु करण्यास परवानगी मिळाली. रेमडेसिवीरची पहिली खेप स्टॉकिस्टला वितरित करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नातून म्युकरमायकोसिसवरील एम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अम्फोटेरिसिन बी इंजेक्शन निर्मितीसाठी परवानगी मिळाली आहे. या इंजेक्शन बनवण्याच्या प्रक्रियेला येत्या 15 दिवसात सुरूवात होणार आहे. ब्लॅक फंगस इन्फेक्शनवर याचा वापर होतो. केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली.