मृत्यूच्या रिहर्सलवर या महिलेने खर्च केले ७५ हजार रुपये

करोना मुळे जगभरात करोडो मृत्यू झाले आहेत आणि आजही होत आहेत. करोना मुळे होणाऱ्या मृत्यूंचा चिले मधील एका महिलेवर फारच प्रभाव पडला आहे आणि या महिलेने चक्क स्वतःच्या अंत्यसंस्काराची रिहर्सल केली तीही चांगले ७१० पौंड म्हणजे ७५ हजार रुपये खर्च करून. या कार्यक्रमाला तिने नातेवाईक, मित्र मैत्रिणींना आमंत्रित केले होते.

५९ वर्षीय मायारा नावाच्या या महिलेने गेले काही दिवस करोना मुळे मृत्यूच्या वार्ता ऐकून स्वतःचा अंतिम संस्कार करून पाहावा असा विचार केला. या विचित्र योजनेत सहभागी होण्यासाठी तिने नातेवाईक, मित्र यांना पटविले. या रिहर्सल साठी तिने भाड्याने एक शवपेटिका आणली आणि त्याची अंत्यसंस्काराच्या वेळी केली जाते तशी सजावट केली. पांढरा वेश, डोक्यावर फुलांचा मुकुट घालून मायारा काही तास या शवपेटीत झोपून राहिली. यावेळी तिने नाकात कापसाचे बोळे सुद्धा घातले. तिचे नातेवाईक, मित्र यांनी खोटे रडण्याचे नाटक करून फोटो काढले.

सोशल मीडियावर या प्रकारची जोरदार चर्चा होत असून अनेकांनी मायाराच्या या मुर्खपणा बद्दल तिच्यावर टीका केली आहे. प्रसिद्धी मिळविण्याचा स्वस्त मार्ग आणि करोना मृतांची टिंगल अशी टीका तिच्यावर होत आहे.