भाजपला कुठे सापडतात हे असले नग? माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संतापले जितेंद्र आव्हाड


मुंबई – एकीकडे कोरोनाने देशात थैमान घातलेले असताना दुसरीकडे यावरुन राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांची देखील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत भर पडली आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी अजब वक्तव्य केले आहे. एकीकडे लोकांचे कोरोनामुळे मृत्यू होत असताना आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरवर त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.


गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्रिवेंद्र सिंह यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. म्युटेड कोरोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी कोरोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले.

तसे पाहायला गेलो, तर कोरोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. त्यालाही बाकी जीवांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण आपण स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. पण त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवत असल्याचे त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी काय करावे लागेल यासंदर्भातही त्रिवेंद्र सिंह यांनी भाष्य केले आहे. आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या विषाणूच्या पुढे जावं लागणार असल्याचे त्रिवेंद्र सिंह म्हणाले आहेत.