बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा – बच्चू कडू


अकोला – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करावे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल,अशा परिस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणेस दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी कोरोना रुग्ण स्थिती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता बेड तसेच ऑक्सीजन व व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढवावी. तसेच ऑक्सीजन उपलब्धता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली.आगामी काळात तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात व बालकांना बाधीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तयार करावे, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेबाबत आढावा घेऊन दुसरा डोस घेण्याऱ्या व्यक्तींना प्राधान्य द्यावे. तसेच लसीकरण केंद्रावर आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच केंद्रावर अनावश्यक गर्दी होणार नाही याकरीता उपायोजना कराव्यात. ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणाकरीता जनजागृती करुन लसीकरणाकरीता प्रोत्साहित करावे, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरची पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली पाहणी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट देऊन कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधाची पाहणी केली. दरम्यान रुग्णाना चांगल्या दर्जाचे जेवण व रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. पाहणीदरम्यान रुग्णालयातील वार्डाची पाहणी करुन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्याच्या समस्या जाणून घेतल्या. रुग्णांनाच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.