शेळी व मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मान्यता; सुनील केदार यांची माहिती


मुंबई : जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याने पात्र पशुपालकांनी सुधारित योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

मंत्री केदार म्हणाले, सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सन 2011 मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणे राबविण्यात येत होत्या. तेव्हापासून आजपावेतो (मागील 10 वर्षात) या योजनेतील दरामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा करण्यात आलेली नव्हती. शेळी/ मेंढीच्या खरेदी दरामध्ये मागील 10 वर्षात कोणतीही वाढ न झाल्यामुळे योजना व्यावहारिकदृष्ट्या राबविणे शक्य होत नसल्याने, या योजनेचा अपेक्षित लाभ ग्रामीण भागामध्ये दिसून येत नव्हता. सदरील योजना ग्रामीण भागातील मजूर, भूमीहीन शेतकरी तसेच अल्पभुधारक शेतकरी यांच्यासाठी स्वयंरोजगार मिळून देण्यासंदर्भात अत्यंत लाभदायक ठरणारी असल्याने योजनेत सुधारणा आवश्यक होती.

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनांमधील सध्याच्या शेळी मेंढी खरेदी किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थींना त्यांचे पसंतीनुसार पैदासक्षम शेळ्या व मेंढ्या खरेदी करता येतील. सन 2011 नंतर शेळी मेंढी मांसाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, पशुपालकांना चांगल्या प्रकारच्या पैदासक्षम शेळ्या उपलब्ध करून देण्यासाठी शेळ्या मेंढ्यांच्या किंमतीत वाढ करणे आवश्यक होते. राज्यात शेळीपालन व्यवसायास यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष घटक, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांचाही यामध्ये समावेश असल्याने समाजातील दुर्बल घटक, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक लाभार्थींना याचा फायदा होणार असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याचेही केदार यांनी सांगितले.

यापूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येऊन या योजना नवीन स्वरुपात राबविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सद्यस्थितीतील योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध जातीच्या शेळी/मेंढी पूर्वी ठराविक जिल्ह्यात खरेदीची परवानगी देण्यात आली होती. ती आता संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात आली आहे, असेही केदार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाने मान्य केलेले शेळी मेंढ्यांचे सुधारित दर खालील प्रमाणे राहतील.

  • शेळी- उस्मानाबादी / संगमनेरी 8,000 रुपये
  • शेळी-बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 6,000 रुपये
  • बोकड- उस्मानाबादी / संगमनेरी 10,000 रुपये
  • बोकड- बेरारी, कोकणकन्या व स्थानिक जाती 8,000 रुपये
  • मेंढी- माडग्याळ 10,000 रुपये
  • मेंढी- दख्खनी व स्थानिक जाती 8,000 रुपये
  • नर मेंढा-माडग्याळ 12,000 रुपये
  • नर मेंढा-दख्खनी व स्थानिक जाती 10,000 रुपये