सरकारी समितीची कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये 12 ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस


नवी दिल्ली : कोरोनाविरोधात देशात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस नागरिकांना दिले जात आहेत. त्यातच देशातील अनेक राज्यांमध्ये या लसींचा तुटवडा आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्यापपर्यंत म्हणावे तसे सुरु होऊ शकलेले नाही. याच दरम्यान एका सरकारी पॅनलने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची सरकारच्या NTAGI या समितीने शिफारस केली आहे. तर कोव्हॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. तर गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

सरकारी समितीने केलेल्या शिफारशी अशा प्रकारे आहेतः

  • तीन ते चार महिन्याचे (12 ते 16 आठवडे) अंतर कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये ठेवण्याची शिफारस सरकारच्या NTAGI समितीने केली आहे. तर कोव्हॅक्सिनसाठी कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचे अंतर असेल.
  • कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांना ऐच्छिक आहे, आपल्या डॉक्टरांचा त्यांनी सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणाऱ्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात.
  • कोरोनबाधित नागरिकांनी बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही NTAGI समितीने केली आहे.