मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत ५२ टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दिनांक 11 मे 2021 पर्यंत एप्रिल 2021 व मे 2021 या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 35 किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 8278 मे.टन तांदूळ आणि 12231 मे. टन इतक्या अन्नधान्याचे 52 टक्के शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना मे 2021 व जून 2021 करीता अनुज्ञेय असलेले नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रतिमाह 5 किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत मे महिन्याकरीता 6862 मे.टन तांदूळ व 4668 मे. टन गहू इतक्या अन्नधान्याचे 29 टक्के शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात आले आहे. तसेच NER शिधापत्रिकाधारकांना देखील शासनाच्या देय परिमाणानुसार अन्नधान्य वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक तथा संचालक, नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली.