सिरम, भारत बायोटेक दर महिना बनविणार १७.८ कोटी करोना लस डोस

देशात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने पुढील चार महिन्यात लसीचे किती उत्पादन होणार आहे याची योजना केंद्रीय आरोग्य खात्याला सादर केली आहे. त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूट पुण्यातील उत्पादन प्रकल्पात ऑगस्ट पर्यंत लसीचे उत्पादन दरमहा १० कोटींपर्यंत वाढवत आहे तर हैद्राबादची भारत बायोटेक याच काळात लसीचे उत्पादन ७.८ कोटी डोस पर्यंत वाढविणार आहे.

देशात करोनाचा प्रकोप सुरु आहेच पण त्यात काही राज्यांना कोविड लस अपुरी पडत असून त्यांच्याकडून लसीला मागणी आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या कंपन्यांकडे पुढील चार महिन्यांची उत्पादन योजना काय आहे याची माहिती मागविली होती. हैद्राबाद मधील भारत बायोटेकची करोना लस स्वदेशी आहे तर कोविशिल्ड लस ऑक्सफर्ड एस्ट्रजेनका यांच्या सहकार्याने विकसीत केली गेली आहे.

भारत बायोटेकचे संचालक डॉ. व्ही कृष्णमोहन यांनी जुलाई मध्ये ३.३२ कोटी डोस उत्पादन केले जाणार असून ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये हेच उत्पादन वाढवून ७.८२ कोटीवर नेले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सिरमचे प्रकाशकुमार सिंह यांनी कोविशिल्डचे उत्पादन ऑगस्टमध्ये १० कोटी डोस वर नेले जात असून सप्टेंबर मध्ये सुद्धा १० कोटी डोस उत्पादन केले जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाला कळविले आहे.—————–