सलमान, धर्मेंद्रची कृपा, महाराष्ट्रात कृषी पर्यटन व्यवसायात उत्तम वाढ

बॉलीवूड कलाकारांच्या प्रसिद्धीचा उपयोग कुणाला कसा होईल हे सांगता येणार नाही. बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान आणि जुन्या काळातील ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांचा हातभार न कळत का होईना पण महाराष्ट्रातील कृषी पर्यटन विकासाला लागला असून करोना काळात सुद्धा कृषी पर्यटन सुविधा देणाऱ्या शेतकऱ्यांनी करोडोंची कमाई केली असल्याचे समजते.

पनवेल जवळ सलमान खान याचे फार्म हाउस आहे आणि सध्या शेतीत रमलेले धर्मेंद्र त्यांच्या शेतीचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मिडियावर शेअर करत असतात. याचा लाभ महाराष्ट्रातील कृषी पर्यटन व्यवसायाला झाला आहे. गतवर्षी करोना काळात सुद्धा ८ लाखाहून अधिक पर्यटकांनी कृषी पर्यटनाचा आनंद लुटला आणि त्यातून शेतकऱ्यांना करोडोंची कमाई करता आली असे पर्यटन विभागाकडून सांगितले गेले आहे.

पश्चिम घाट क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्रात वर्षभर पर्यटन करता येते. त्यात निसर्गसुंदर कोकणांत परदेशातून सुद्धा पर्यटक हजेरी लावत आहेत. करोना काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. या सुविधेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रिसोर्ट व पर्यटन केंद्रे लोकांना आकर्षित करत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे अधिकारी सांगतात, धर्मेंद्र आणि सलमान यांच्या शेतांच्या फोटो आणि व्हिडीओ मुळे अनेकाच्या मनात कृषी पर्यटनाचे आकर्षण निर्माण होण्यास मदत मिळाली आहे. महाराष्ट्राने नेहमीच कृषी पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे आणि विशेष म्हणजे या क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप अजिबात नाही.

१६ वर्षापूर्वी पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाचा प्रायोगिक प्रकल्प एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत सुरु केला. त्यानंतर दोन वर्षात कृषी पर्यटन प्रशिक्षण आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन झाले. या क्षेत्रात तावरे यांच्या कृषी पर्यटन विकास निगमने चांगले काम केले. शाळेतील विद्र्यार्थ्यात शेतीचे आकर्षण निर्माण होऊ लागल्यावर या व्यवसायाचा चेहरा मोहरा बदलला. सध्या राज्याच्या २९ जिल्ह्यात ३२८ कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत आहेत. येथील शांतता, शुद्ध हवा पर्यटकांना आकर्षित करते आहे. यामुळे महाराष्ट्रातील या क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांच्या कमाईमध्ये २५ टक्के वाढ झाली असून गेल्या वर्षात यातून ५६ कोटींची कमाई केली गेल्याचे आकडेवारी सांगते.