मे महिन्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार दोन वेळा मोफत अन्नधान्य


मुंबई : माहे मे – २०२१ मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यतंर्गत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून असे दोन वेळा मोफत अन्नधान्य मिळणार असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहायाअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थींना दिनांक १० मे २०२१ पर्यंत माहे एप्रिल २०२१ व मे २०२१ या दोन महिन्यांपैकी एका महिन्याचे प्रति सदस्य ३ किलो गहू व २ किलो तांदूळ आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत असून आतापर्यंत ७१०१ मे.टन तांदूळ आणि १०५१७ मे. टन इतक्या अन्नधान्याचे ५१% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण पूर्ण करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभादींना माहे मे २०२१ व जून २०२१ करीता अनुज्ञेय असलेले नियमीत अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रति महा ५ किलो अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत मे महिन्याकरीता ५२३९ मे. टन तांदूळ व ३५६१ मे. टन गहू इतक्या अन्नधान्याचे २२% शिधापत्रिकाधारकांना मोफत वितरण करण्यात आले आहे.

मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या सर्व परप्रांतिय स्थलांतरीत पात्र लाभार्थींनी एक देश एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत Portability व्दारे नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करून घ्यावे.

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवरील RC Details मध्ये जाऊन त्यांना शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी. उपरोक्त वितरणासंदर्भात तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२-२२८५२८१४ तसेच ई-मेल क्रमांक dycor.ho-mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूपासून वंचित राहू नये याकरीता आवश्यक सूचना सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांचेमार्फत शिधावाटप यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानात गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून प्राप्त करून घ्यावे. असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी केले आहे.