कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा; भाजप महिला मंत्र्याचा दावा


भोपाळ – देशातील अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच अनेक राज्यांमध्ये आऱोग्य सुविधांचा तुटवडा पडू नये म्हणून युद्धस्तरावर काम सुरु आहे. कोरोनाबाधितांची संख्या मध्य प्रदेशमध्येही वाढत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मागील काही कालावधीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहे. असे असतानाच काही नेते विचित्र वक्तव्य करुन गोंधळ निर्माण करत असल्याचे चित्रही दुसरीकडे पहायला मिळत आहे. गोमूत्र प्यायलाने कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा होतो, असा दावा उत्तर प्रदेशमधील नुकताच एका नेत्याने केला होता. यावरुन बराच वादही झाला होता.

हा वाद शांत होत नाही तोच आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजप मंत्री उषा ठाकुर यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी एक अजबच सल्ला दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर सर्वांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा, असा सल्ला दिला आहे.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच मध्य प्रदेशलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे राजधानी भोपाळबरोबरच अन्य शहरांमध्ये शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. भोपाळमधील कोरोनामुळे मरण पावलेल्या मृतांवर करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराचे फोटो संपूर्ण देशात आणि जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरले.

त्यातच आता मध्य प्रदेशमधील भाजप सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नियोजन करत आहे. असे असतानाच राज्याच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्री उषा ठाकुर यांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला आहे. यज्ञ करणे ही भारताची सनातन आणि पुरातन परंपरा असल्याचे सांगत ठाकूर यांनी किती वाजता यज्ञ केला पाहिजे, हे सुद्धा सांगितले आहे.

कोरोनाची तिसरी लाट यज्ञ केल्याने भारताला स्पर्शही करणार नाही. सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व तयारी केली आहे. सर्व प्रयत्न करुन आम्ही ही साथ आटोक्यात आणू, असा विश्वास देखील उषा यांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी सर्वांनी यज्ञ करावे. आता १०,११,१२ आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ ही चिकित्सा आहे. यज्ञ हे कर्मकांड आणि अंधश्रद्धा नसून पर्यावरण शुद्ध करण्याचा एक मार्ग असल्याचे उषा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबतचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.