म्युकोरमायकॉसिसच्या उपचारासाठी हाफकिन इंस्टिट्यूटकडून ठाकरे सरकार खरेदी करणार 1 लाख इंजेक्शन


मुंबई – कोरोनानंतर आता राज्याभोवती म्युकोरमायकॉसिसचा (Black Fungus) विळखा वाढत असल्यामुळे राज्य सरकारने या आजारासंदर्भात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याच्या उपचारासाठी लागणाऱ्या अॅम्फोतेरसीन इंजेक्शनच्या 1 लाख डोसची ऑर्डर सरकारने दिल्याचे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

म्युकोरमायकॉसिस हा अत्यंत गंभीर आजार असून त्याचे शरीरावर होणारे परिणामही भयंकर असल्यामुळे या प्रकारच्या रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार असल्याचा पुनरुच्चार टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला.

त्याचबरोबर या आजारावरील उपचारासाठी लागणारे इंजेक्शन हे महागडे असून ऐनवेळी रुग्णसंख्या वाढली तर त्याचा तुटवडा होऊ नये किंवा गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी अॅम्फोतेरसीन इंजेक्शनच्या 1 लाख डोसची ऑर्डर हाफकिन इन्स्टिट्यूटला दिल्याचे राजेश टोपे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर म्युकोरमायकॉसिसवर उपचारासाठी लागणारे अॅम्फोतेरसीन हे इंजेक्शन महागडे असल्यामुळे त्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही टोपे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सांगितले.