राज्यातील वाढीव लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य


मुंबई – देशानंतर राज्याला कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठू लागल्यामुळे राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ठाकरे सरकारने कोरोना परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे ३० एप्रिलपर्यंत लागू केलेला लॉकडाऊन नंतर १५ एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस तसेच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसंबंधी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केले आहे.

उद्या कॅबिनेट असण्याची संभावना आहे. त्यासंदर्भात अद्याप सूचना आलेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. जे निर्बंध लॉकडाऊन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.

दरम्यान त्यांनी यावेळी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका, असेही म्हटले आहे. लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असा, माझा अंदाज आहे. पण पूर्ण लॉकडाऊन काढून १०० टक्के मोकळीक होईल, असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे.

सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करत आहे.

दरम्यान महाराष्ट्रात ४५ वर्षांपुढील आणि १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू आहे. पण, लसींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे. कारण या वयोगटातील लसी ४५ वर्षांपुढील गटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती देत राज्यातील लस तुटवड्याची वस्तुस्थिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडली.

राजेश टोपे यांनी यावेळी राज्यातील उपलब्ध लस आणि केंद्राकडून पुरवण्यात येणाऱ्या लसींच्या साठ्याची माहिती दिली. टोपे म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतल्याची माहिती टोपे यांनी दिली.

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी आलेले लसीचे डोस ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशी सूचना महाराष्ट्रातील सर्व लसीकरण केंद्रांना देण्यात आली आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस राहिला आहे, असे नाही. तर कोव्हिशिल्डचे सुद्धा १६ लाख डोस केंद्राकडून यायचे राहिलेले आहेत. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरून १५ ते २० मिनिटे चर्चा केली. त्यांना याबद्दलची माहिती दिली. पण त्यांच्याकडे लसीचे डोस उपलब्ध नसल्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे.

टास्क फोर्सची चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्री असे म्हणाले की, टास्क फोर्सशी चर्चा करून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण काही दिवसांसाठी कमी वेगाने करण्यासंदर्भात सूचना केली आहे. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. कारण खरेदी करण्याची तयारी असली, तरी लस उपलब्ध नसल्याची माहिती टोपे यांनी दिली.