पप्पू यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप; मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा डाव


पटना – देशातील अन्य राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. पण कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावदरम्यान, राज्यातील राजकारणालाही ऊत आला आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी बिहारमधील जनअधिकार पार्टीचे प्रमुख माजी खासदार पप्पू यादव यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता अटकेच्या कारवाईनंतर पप्पू यादव यांनी ट्वीट करून नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.


याबाबत केलेल्या ट्विटमध्ये पप्पू यादव म्हणाले की, नितीश कुमारजी नमस्कार, माझ्या धैर्याची परीक्षा घेऊ नका. अन्यथा जनता व्यवस्था आपल्या हाती घेईल आणि तुमचे प्रशासन लॉकडाऊनबाबतचे सर्व प्रोटोकॉल विसरून जाईल. महिनाभरापूर्वी माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही माझे प्राण पणाला लावून मी लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण मला तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह करून मारू इच्छित आहात.


त्यानंतर पप्पू यादव यांनी अजून एक ट्विट करत म्हणाले आहेत की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने तयारी केली पाहिजे. पण पप्पू यादवविरोधात ते लढत आहेत. आमच्यासोबत सेवेमध्ये, मदतीमध्ये स्पर्धा करा. गुन्ह्यात अडकवून, तुरुंगात पाठवण्याच्या कारस्थानामध्ये वेळ वाया का घालवत आहात, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, बिहार आणि देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी पप्पू यादव यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत नितीश कुमार सरकारवर टीका केली आहे. या निर्णयावर विरोधक नाहीत तर एनडीएमधील सहकारीसुद्धा टीका करत आहेत. तसेच पप्पू यादव यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले असून, त्यांनी राजीव प्रताप रुढी यांच्या अटकेची मागणी केली आहे.