जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे काँग्रेस आमदारांना पडले महागात, वर्ध्यात गुन्हा दाखल


वर्धा : वर्ध्यातील देवळीचे काँग्रेस आमदार रणजीत कांबळे यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे चांगलेच महागात पडले आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्यात आमदार रणजीत कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी तक्रार केल्यानंतर शहर ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा अधिनियम तसेच कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आमदार रणजीत कांबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्याला देवळी मतदारसंघात आयोजित तपासणी शिबीरावरुन शिवीगाळ केली होती. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

अँटिजन, आरटीपीसीआर चाचणीचे शिबीर देवळी तालुक्यात नाचणगाव येथील शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छायाचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. कोणतीही माहिती न देता हे शिबीर आयोजित केल्यावरुन आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरुन धारेवर धरले. यावेळी कांबळे यांची जीभ घसरली आणि शिवीगाळ केली.

दरम्यान महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना म्हणजेच मेग्मोने आमदार रणजीत कांबळे यांचा निषेध केला आहे. या राज्यस्तरीय संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी संघटनेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोबतच आमदार रणजीत कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी करत, कोरोना काळात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आगामी काळात संघटनेकडून कठोर निर्णय घेतला जाईल आणि याची सर्वस्वी जवाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही दिला आहे.

याबाबत आमदार रणजीत कांबळे यांनी सांगितलं की, नेहमीच प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणी होत असते. नाचणगाव येथील शाळेत जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही परवानगीशिवाय अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी शिबीर घेण्यात आले. एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे नियमाचे उल्लंघन करुन शिबिरात उपस्थित होते. तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळच ग्रामीण रुग्णालय आहे. मग शिबिराला राजकीय स्वरुप देण्याचे काय कारण असा सवाल देखील उपस्थित केला.