दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी होत आहे कमी


नवी दिल्ली : काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांची चार लाखांचा टप्पा पार करणारी आकडेवारी आज कमी आली असून, काल दिवसभरात देशात 3,29,942 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर मागील 24 तासात 3,56, 082 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच 3,876 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ही ताजी आकडेवारी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. सोमवारी ही 3.66 लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली होती. गेल्या काही दिवसांची तुलना करता ही संख्या कमी असली तरी देशासमोरील चिंता अजून काही कमी झाली नाही. देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा आणि बेड्स तसेच कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची आकडेवारी हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 37,326 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. तसेच 549 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातील आकडा 40 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,69,425 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.97 टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.