एव्हरेस्ट समिट वर चीन आखतेय सीमारेषा

नेपाळ एव्हरेस्ट बेस कॅम्पवर करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे स्पष्ट झाल्यावर नेपाळ मधून येणाऱ्या गिर्यारोहकांच्या मुळे चीन हद्दीतून एव्हरेस्ट सर् करणाऱ्या गिर्यारोहकांना करोना लागण होऊ नये यासाठी चीनने एव्हरेस्टच्या समिट वर म्हणजे सर्वात उंच जागी सीमारेषा आखण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या शिनुहा वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे तिबेटी गाईड ही विभाजन रेषा आखण्यासाठी एव्हरेस्ट वर रवाना झाले आहेत.

चीनच्या तिबेट भागातून २१ चीनी एव्हरेस्ट मोहिमेवर जात आहेत. ते जाण्यापूर्वी ही रेषा आखली जावी यासाठी तिबेटी गाईड अगोदरच एव्हरेस्टवर गेल्याचे सांगितले जात आहे. नेपाळने बेस कॅम्प वर करोना प्रादुर्भाव होऊनही अजून एव्हरेस्ट मोहिमा स्थगित केलेल्या नाहीत. एप्रिल ते जून या काळात एव्हरेस्ट मोहिमा सुरु राहणार आहेत.

विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच, ८८४८ मीटर उंचीच्या या शिखरावर ज्याला समिट स्थान म्हणले जाते तेथे मुळातच सपाट जागा अगदी कमी आहे. एकावेळी ६ गिर्यारोहक आणि गाईड थांबू शकतील इतकीच ही जागा आहे. त्यामुळे तेथे सीमारेषा कशी बनविली जाणार याचा खुलासा होणे आवश्यक होते पण चीन कडून तसा खुलासा केला गेलेला नाही. गेल्यावर्षी सुद्धा करोना मुळे तिबेट मार्गे एव्हरेस्टवर जाण्यास चीन सरकारने परदेशी गिर्यारोहकांना परवानगी दिली नव्हती.