भारताला कोरोनावर मात करायची असल्यास लसीकरण हाच एक दिर्घकालीन उपाय – डॉ. अँथनी फौची


वॉशिंग्टन – भारतावर आलेल्या सध्याच्या कोरोना संकटासंदर्भात अमेरिकेतील व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी रविवारी भाष्य केले आहे. भारताला जर कोरोना महामारीवर मात करायची असेल, तर लसीकरण हाच एक दिर्घकालीन उपाय असल्याचे फौची यांनी स्पष्ट केले आहे.

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घातक महामारीचा सामना करण्यासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचे प्रमाण वाढवण्याची गरज असल्याचे फौची यांनी म्हटलं आहे. तसेच चीनने वर्षभरापूर्वी कोरोनाची लाट रोखण्यासाठी जे केले तेच आता करण्याची भारताला गरज असल्याचा उल्लेख तात्पुरत्या रुग्णालयांसंदर्भात बोलताना फौची यांनी केला.

या कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी लोकांचे लसीकरण करण्यात आले पाहिजे. भारत जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारा देश असून त्यांना लस निर्मितीसाठी स्वत:च्या देशातील साधनांसोबतच जगभरातून मदत केली जात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार असणाऱ्या फौची यांनी सांगितले.

लस निर्मिती करणारा भारत हा सर्वात मोठा देश असल्यामुळेच, लस निर्मितीसाठी इतर देशांनी भारताला मदत केली पाहिजे किंवा भारताला जास्तीत जास्त लसी दान दिल्या पाहिजेत, असे फौची यांनी पुढे म्हटले आहे. भारतातील परिस्थिती सामान्य झाल्यास लस निर्मितीचा वेग वाढून ती जगभरात पाठवता येईल, असे संकेत यामधून फौची यांनी दिले आहेत.

मुलाखतीमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना फौची यांनी तात्काळ स्वरुपाची रुग्णालये भारतामध्ये उभारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. चीनने एका वर्षापूर्वी ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे गरजेचे असल्याचे फौची म्हणाले. हे भारताला करावेच लागेल. रुग्णालयांमध्ये बेड्स नसल्यामुळे तुम्ही लोकांना रस्त्यावर फिरु देऊ शकत नाही. तिथे ऑक्सिजनसंदर्भातील परिस्थितीही अंत्यंत नाजूक आहे. लोकांना ऑक्सिजन मिळत नाही, हे दूर्देवी असल्याचे मत फौची यांनी व्यक्त केले आहे. तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, पीपीई कीट आणि आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत, असे मत फौची यांनी नोंदवले.

फौची यांनी यावेळी भारतात देशव्यापी लॉकडाऊनची गरज असल्याचा पुनरुच्चार केला. भारतातील परिस्थिती गंभीर असल्याचे आता सर्वाना कळून चुकले आहे. जेव्हा जास्त लोकांना संसर्ग होत असतो तेव्हा त्यांची पुरेशी काळजी घेणेही गरजेचे असते, असे काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. भारताने संपूर्ण लॉकडाऊन लागू केला तरच हा प्रश्न सुटू शकेल, असे संसर्गजन्य रोग क्षेत्रात तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या फौची यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.

गेल्या वर्षी चीनने तेच केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इतर देशांनी मर्यादित प्रमाणात का होईना लॉकडाऊन केला. तुम्हाला त्यासाठी सहा महिने लॉकडाऊनची गरज नाही, केवळ काही आठवडे लॉकडाऊन केला तरी त्याचा परिणाम दिसून येईल. लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावला अटकाव होत असतो हा आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटते, असे डॉ. फौची म्हणाले होते.