राज्यात ‘त्या’ वयोमर्यादेतील लोक ‘कोव्हॅक्सिन’च्या दुसऱ्या डोसपासून वंचित!


मुंबई – देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण त्यातच आता महाराष्ट्रात ४५ वयापुढील कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटून गेलेले जवळपास साडेपाच लाख लोक कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोस मिळण्याची वाट पाहत आहेत. पण या लोकांसाठी केंद्र सरकारकडून अद्याप कोव्हॅक्सिनच्या लसीचा साठा देण्यात आलेला नसल्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे साडेपाच लाख लसी ताबडतोब उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन व सीरम कंपनीची कोव्हीशिल्ड या दोन लसी भारतात आजघडीला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पुटनिक ही रशियाची लस आगामी काळात उपलब्ध होणार आहे. सध्या कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता दीड कोटी तर कोव्हीशिल्डची क्षमता सहा कोटी आहे. या दोन्ही कंपन्यांना केंद्र सरकारने अनुक्रमे दीड हजार कोटी व तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे या कंपन्यांकडून आगामी काळात सहा कोटी व दहा कोटी लसींचे उत्पादन होईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

सध्याचे या लसींचे एकूण उत्पादन लक्षात घेता १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. तत्पूर्वी फ्रंटलाईन वर्कस तसेच ४५ वयापुढील लोकांना लस देण्याचे केंद्राचे धोरण होते. सध्या महाराष्ट्रात ४५ वयापुढील ९,३९,५७५ लोकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

यातील ५,४०,०५६ लोकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्याला आता चार आठवडे उलटून गेले असून अनेकांचे सहा आठवडे झाले आहेत. हे साडेपाच लाख लोक दुसरा डोस कधी मिळेल या प्रतिक्षेत असून अद्याप केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिनच्या लसींचा पुरवठा करण्यात न आल्यामुळे ४५ वयापुढील लोकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ७ मे २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भुषण यांना पत्र लिहून तातडीने कोव्हॅक्सिनच्या साडेपाच लाख लसी पाठविण्याची विनंती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केली आहे.

राज्य सरकारने ४५ वयोगटापुढील लोकांना लस देताना लसींचा कोणताही बफर साठा करू नये, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे राज्य सरकारनेही कोव्हॅक्सिनचा कोणताही साठा केला नव्हता. डॉ प्रदीप व्यास यांनी याची स्पष्ट जाणीव करून देत आता पहिला डोस घेऊन चार आठवडे उलटलेल्या साडेपाच लाख लोकांसाठी तात्काळ कोव्हॅक्सिन लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन चार आठवडे ते सहा आठवडे पूर्ण झालेल्या लोकांना लसीचा दुसरा डोस देण्याबाबतचे धोरण सर्वोच्च प्राधान्याने सुस्पष्ट करावे, असेही डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

केंद्राकडून कोणत्या वेळेत किती लशींचे डोसेस महाराष्ट्राला मिळतील, लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य सरकार किती किमतीला किती प्रमाणात लस घेऊ शकते आदी काही मुद्द्यांवर अजूनही केंद्राकडून स्पष्टता मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील ४५ वयापुढील किती लोकांचे लसीकरण झाले व त्यातील किती लोकांना चार आठवड्यानंतर लस द्यावी लागणार हे वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले होते, तरीही केंद्राकडून तरीही केंद्राकडून कोव्हॅक्सिनच्या पुरेशा लसी न मिळाल्यामुळे साडेपाच लाख लोक दुसऱ्या लसीकरणापासून वंचित आहेत.