महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांवर होणार मोफत उपचार!


जालना – म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण ग्रस्त असल्याचे आढळून येत आहे. त्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या आजाराबाबतच्या जागृतीसाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार देखील केले जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना केली. आरोग्यमंत्री टोपे यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे.

याबाबत माहिती देताना टोपे यांनी नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे सांगितले. या आजारावर लवकर उपचार नाही केले, तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरी परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेच असल्यामुळे त्याबाबत नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या आजारावरील औषधे महागडी असून त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन दखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत असून त्याची किंमत लवकरच निश्चित करून त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांनी या आजारामुळे घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.