चीनने २०१५ मध्येच जैविक अस्त्र म्हणून करोनाचा वापर करण्याबाबत केली होती चर्चा

करोना आणि चीन या संदर्भात एक धक्कादायक खुलासा नुकताच झाला आहे. लिक झालेल्या काही गुप्त कागदपत्रांची तपासणी केल्यावर चीन वैज्ञानिकांनी २०१५ मध्येच करोनाचा वापर एक जैविक हत्यार म्हणून करता येईल याविषयी चर्चा केल्याची माहिती उघड झाली आहे. चीनी वैज्ञानिक आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘अनुवांशिक हत्यारांचे नवे युग’ या विषयावर केलेल्या चर्चेत करोना विषाणूला एक कृत्रिम रूप देऊन त्याचा वापर जैविक हत्यार म्हणून करता येईल यावर चर्चा केली होती.

या संदर्भात द ऑस्ट्रेलियन मध्ये एका लेखातून असा दावा केला गेला आहे. त्यानुसार काही महत्वाची कागदपत्रे लिक झाली आहेत. ‘द अननॅचरल ओरिजिन ऑफ सार्स अँड न्यू स्पीसीज ऑफ मॅनमेड बायोवेपन’ या पेपर मधली ही माहिती आहे. तिसरे जागतिक युध्द जैविक हत्यारांनी लढले जाईल असे चीन पूर्वीपासून सांगत आला आहे. सार्स विषाणूचाच वापर हत्यार म्हणून कसा करता येऊ शकतो यावर ही चर्चा झाली होती असा दावा केला जात आहे.

जगभर करोनाचा प्रकोप जारी आहे. चीन मधूनच हा विषाणू जगभर फैलावल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत मात्र चीनने हे आरोप सतत फेटाळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कागदपत्रे लिक झाल्याने त्याला वेगळे महत्व आले आहे. ऑस्ट्रेलियन रणनीतिक संस्थान म्हणजे एएसपीआय मधील अधिकारी सांगतात सायबर सिक्युरिटी विशेष तज्ञाने या चीनी कागदपत्राचे विश्लेषण केले आहे. ही कागदपत्रे अस्सल असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे.