या देशांमध्ये असेही अजब कायदे !


कुठल्याही देशांतील कारभार सुरळीत चालण्यासाठी तेथील कायदेव्यवस्था मोठ्या प्रमाणावर जबाबदार असते. नागरिकांचे मूलभूत हक्क, विकासनीती, सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊनच हे कायदे पारित करण्यात येत असतात. मात्र काही देशांमध्ये अस्तित्वात असणारे कायदे अजबच म्हणावे लागतील. अशा प्रकराचे कायदे पारित करण्यामागे ज्या-त्या राष्ट्राचे स्वतःचे तर्क योग्य असले, तरी या कायद्यांबद्दल जाणून घेऊन आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अलीकडेच ब्रुनेईच्या सुलतानाने लैंगिक अत्याचारांच्या विरुद्ध कायदा अंमलात आणला होता. या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये दोषी सिद्ध होईल त्या व्यक्तीला देहदंडाची शिक्षा फर्माविण्यात येण्याबद्दल हा कायदा होता. वास्तविक अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये देहदंडाची शिक्षा देण्यावर कोणाची हरकत नव्हती, पण हरकत होती देहदंड देण्याच्या पद्धतींवर. सुलतानाने जारी केलेल्या हुकुमानुसार गुन्हेगाराला दगडांनी मारून देहदंड दिला जावा असा हा कायदा होता. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर या कायद्याची जगभरामध्ये आलोचना करण्यात आली. जगभरातून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि आंतरराष्ट्रीय दबाव यांमुळे अखेर हा कायदा रद्द ठरविण्यात आला.

इंग्लंडमधील मॅसच्युसेट्स बे येथे रात्री आंघोळ केल्याविना बिछान्यामध्ये झोपणे बेकायदेशीर आहे ! येथे जर कोणी विना स्नान करता रात्री बिछान्यामध्ये झोपण्यास जाताना पकडला गेला, तर त्याला चक्क तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठविला जाण्याचे प्रावधान येथील स्थानिक कायद्यांमध्ये केले गेले आहे. विशेष म्हणजे दररोज रात्री विना आंघोळ करता झोपणे बेकायदेशीर आहेच, शिवाय रविवारच्या दिवशी स्नान करणेही येथे बेकायदेशीर आहे ! असाच काहीसा अजब कायदा स्वित्झर्लंड देशामध्येही अस्तित्वात आहे. येथे कोणत्याही इमारतीमध्ये राहत असता, रात्री दहा नंतर शौचालयाचा वापर केल्यास फ्लश करण्यावर कायद्याने बंदी आहे. फ्लशच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असून, आसपासच्या अपार्टमेंट्स मध्ये राहणाऱ्या लोकांना या आवाजाने त्रास होऊ शकत असल्याचा समज येथे रूढ असल्याने हा कायदा अस्तित्वात आणला गेला आहे.

पूर्वी चार अनोळखी मंडळी एके ठिकाणी थोड्या वेळाकरिता जरी जमली, तरी नकळत गप्पा कधी रंगू लागायच्या हे कळायचे देखील नाही. आजकाल अनोळखी लोकांशी आपण होऊन बोलण्याची सवय तर सोडाच, पण एकमेकांकडे पाहून साधे स्मितहास्य करण्याची पद्धतही जिथे नाहीशी होत चालली आहे, तिथे इटलीतील मिलान शहराध्ये मात्र एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे या शहरातील मंडळी सदैव हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांना सामोरी जात असतात. मात्र एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्याने तिला रुग्णालयामध्ये भेटण्यास जाताना आणि एखाद्याच्या मृत्यूप्रसंगी अंत्यविधीसाठी जाताना स्मितहास्य करण्यावर कायद्याकडून सूट देण्यात आली आहे.

आपल्याकडे घरामध्ये अनेक लहानमोठ्या दुरुस्त्या तर आपण स्वतःच करीत असतो. उदाहरणार्थ एखादा विजेचा बल्ब निकामी झाला, तर तो झटपट बदलून त्या ऐवजी नवा बल्ब लावून आपण आपले काम पुढे सुरु करतो. मात्र ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरामध्ये मात्र तुम्हाला असे करता येणार नाही. बल्ब बदलण्याच्या साध्या कामगिरीसाठी देखील तुम्हाला सरकारमान्य इलेक्ट्रिशियन बोलावून त्याच्याकडूनच बल्ब बदलवून घेणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड ठोठविला जाण्याची तरतूद येथील कायद्यामध्ये आहे. आजकाल आपल्या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी अनेक तऱ्हेच्या कॉस्मेटिक सर्जरी प्रचलित आहेत, महिलावर्गामध्ये या सर्जरी विशेष लोकप्रिय आहेत. अनेक महिला दातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कृत्रिमरित्या तयार केलेले दात लावून घेत असतात. मात्र अमेरिकेतील व्हार्मोंटमध्ये राहणाऱ्या महिलांना कृत्रिम दात लावण्याआधी आपल्या पतीची लिखित संमती घेणे आवश्यक असल्याचा कायदा येथे अस्तित्वात आहे !

Leave a Comment