जगामध्ये लोकप्रिय आहेत असे ही जीवघेणे खेळ !


‘खेळ हे एक प्रकारचे युध्द असून, यामध्ये जीवितहानी मात्र होत नाही’ असे विधान सुप्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक टेड टर्नर यांनी केले होते. मात्र काही खेळांचे आक्रमक स्वरूप पाहता टर्नर यांचे विधान संपूर्णपणे ययोग्य म्हणता येईलच असे नाही. आजच्या काळामध्ये जगभरामध्ये असे अनेक खेळ अस्तित्वात आहेत, जे जीवघेणे ठरले आहेत. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांवरून सर्फिंग करण्याचा थरार अनेक जणांना आवडतो. मात्र या खेळामध्ये अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. एका सर्वेक्षणाच्या अनुसार दर वर्षी जगभरातील किमान दहा लोक या खेळापायी आपले प्राण गमावीत असतात. समुद्रामध्ये असलेल्या अंतर्गत वेगवान प्रवाहांचे अंदाज न आल्याने अगदी पट्टी पोहणारेही सर्फिंग करीत असताना बुडून मृत्युमुखी पडले आहेत.

सर्फिंग प्रमाणेच स्केट बोर्डिंग हा खेळही अनेकांसाठी धोकादायक ठरला आहे. किंबहुना एकट्या अमेरिका देशामध्ये स्केट बोर्डिंग करीत असताना पडून किंवा तोल जाऊन झालेल्या इजेमुळे दरवर्षी सुमारे ६४,००० व्यक्तींन वैद्यकीय मदतीची आवश्यकता पडत असते. स्केट बोर्डिंग करीत असताना पडून झालेल्या गंभीर इजांमुळे अनेक लोकांनी प्राणही गमाविले आहेत. स्केट बोर्डिंग प्रमाणे स्कीईंग, म्हणजे बर्फावरून घसरत जाण्याचा खेळही अनेकांसाठी जीवघेणा ठरला आहे. ‘रोडियो’ किंवा ‘बुल रायडींग’ या स्पर्धेमध्ये खेळाडूचा सामना चांगल्या धष्टपुष्ट बैलाशी होत असतो. या नाठाळ बैलावर आरूढ होण्याच्या प्रयत्नांमध्ये इजा होणे अपरिहार्य असते. तसेच यामध्ये जीवावर बेताण्याचा धोकाही तितकाच मोठा असतो.

स्काय डायव्हिंग, ग्लायडिंग, या खेळांमध्ये इजा होण्याची शक्यता अधिक असली, तरी या खेळांमध्ये खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी उत्तम व्यवस्था केली जात असल्याने या खेळांमध्ये अपघातांचे प्रमाण पुष्कळ कमी आहे. त्या विरुद्ध धावणे, किंवा सायकलिंग या सर्वसामान्य खेळांमध्ये अपघातांची शक्यता अधिक असून, सायकल चालविताना पडून जखमी होणे, किंवा दुसऱ्या वाहनाला धडकल्याने झालेल्या अपघातांमध्ये खेळाडूंना गंभीर इजा झाल्याच्या अनेक घटना घडून गेल्या आहेत.

Leave a Comment