ही आहे जगातील एकमेव अनोखी ‘लव्ह बँक’


बँक म्हटले की आपल्या डोक्यामध्ये पैशांचे व्यवहार सुरु होतात, पण स्लोव्हाकिया देशातील बन्स्का स्टीव्हनिका नामक लहानशा शहरामध्ये जशी बँक आहे, तशी बँक भारतातच काय, तर जगातील इतर कोणत्याही देशामध्ये अस्तित्वात नाही. या आगळ्या वेगळ्या बँकेमध्ये पैसे जमा केले जात नाहीत, तर प्रेमकहाण्या जमा केल्या जातात. ‘लव्ह बँक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेच्या वतीने दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्त या बँकेमध्ये खास प्रदर्शनही आयोजित केले जात असते. या प्रदर्शनाला देश-विदेशातील असंख्य प्रेमी युगुले आवर्जून हजेरी लावत असतात. ही सर्व युगुले या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपापल्या प्रेमकहाण्या शब्दरूपामध्ये लिहून या कहाण्या, आपल्या प्रेमकहाणीच्या आठवणी म्हणून जपलेल्या वस्तू, या ‘लव्ह बँके’मध्ये जमा करतात.

स्लोव्हाकिया देशातील बन्स्का स्टीव्हनिका या लहानशा शहरामध्ये बनविली गेलेली ही ‘लव्ह बँक’ वास्तविक स्लोव्हाकीयातील सुप्रसिद्ध कवी आंद्रेज स्लेडकोव्हिक यांनी लिहिलेल्या ‘मरीना’ नामक कवितेपासून प्रेरित आहे. किंबहुना ‘मरीना’ ही साहित्यिक विश्वामध्ये सर्वात मोठी प्रेम कविता म्हणून ओळखली जाते. ही प्रेमकविता स्लेडकोव्हिक आणि त्याची प्रेयसी मरीना पिशलोवा यांच्यातील प्रेमसंबंधांना समर्पित असून, ज्या घरामध्ये मरीना राहत असे, त्याच घरामध्ये ही ‘लव्ह बँक’ आहे. या ‘लव्ह बंके’मध्ये १००,००० हूनही अधिक ‘सिक्युरिटी बॉक्सेस’ असून, या पेट्यांमध्ये हजारो प्रेमकहाण्या, प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या, प्रेमी युगुलांनी एकमेकांना भेट दिलेल्या असंख्य वस्तू आहेत. ‘लव्ह बँक’ असलेली ही इमारत स्लोव्हाकिया येथील संस्कृतीचे प्रतीक असून, युनेस्कोच्या वतीने ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’ चा दर्जाही या इमारतीला दिला गेला आहे.

दरवर्षी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्त येथे आयोजित होत असणाऱ्या प्रदर्शनासाठी येथे काही महिने आधीपासूनच जय्यत तयारी करण्यात येत असते. या प्रदर्शानामध्ये सहभागी होऊन आपल्या प्रेमकहाण्या किंवा प्रेमाचे प्रतीक असलेल्या काही वस्तू येथे जमा करण्याच्या उद्देशाने हजारो प्रेमीजन या प्रदर्शनासाठी आवर्जून उपस्थित रहात असतात. मरीना रहात असलेल्या घराच्या तळघरामध्ये ही ‘लव्ह बँक’ असून हे घर पाचशे वर्षांपूर्वी बांधले गेले होते. त्यापूर्वी या ठिकाणी सोन्याची खाण असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment